तब्बल आठ वर्षांच्या प्रयत्नानंतर ६०० किलो वजनाची मगर पकडण्यात यश आलं आहे. जवळपास साडे पंधरा फुट लांब असणाऱ्या या मगरीला पकडल्यानंतर वनधिकाऱ्यानं सुटकेचा निश्वास सोडला आहे. २०१० साली ही अजस्त्र मगर काही स्थानिकांनी ऑस्ट्रेलियातील कॅथरिन गावाजवळ पाहिली होती. तेव्हापासून या मगरीचा शोध सुरू होता.

या मगरीनं कोणावरही हल्ला करू नये यासाठी तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र इतके वर्षे शोध घेऊनही तिला पकडता आलं नाही. वनधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही मगर ६० वर्षांची आहे. कॅथरिन नदी पात्रात आढळलेली आतापर्यंतही ही सर्वात मोठी मगर असल्याची माहितीही वनधिकाऱ्यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियात खाऱ्या पाण्यातील मगर मोठ्या प्रमाणत आढळतात. या मगरी कधी कधी स्थानिकांवर हल्लाही करतात. दरवर्षी अशा हल्ल्यात किमान दोनजण मारले जातात. तर किमान २५० हून अधिक मगरींना दरवर्षी पकडून वनधिकारी त्यांना मानवी वस्त्यांपासून दूर घेऊन जातात.

गेल्या आठ वर्षांपासून वनधिकारी या मगरीच्या शोधात होते. तिला पकडणं मोठं जोखमीचं काम होतं. एवढी अजस्त्र मगर आम्ही आतापर्यंत पाहिली नव्हती. मात्र तिला पकडण्यात आम्हाला यश आलं आहे तिला मानवीवस्त्यांपासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागातील वन्यजीव अधिकारी ट्रेसी यांनी दिली आहे.