हैदराबादमध्ये राहणाऱ्या ७ वर्षांच्या समन्यू पोथुराजू या मुलानं आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलीमांजारो सर केला आहे. हा पर्वत सर करणारा तो आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक ठरला आहे. २९ मार्चला त्यानं आपल्या आईसोबत पर्वत सर करायला सुरूवात केली. २ एप्रिलला त्यानं यशस्वीरित्या हा पर्वत सर केला.

समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असलेला हा पर्वत टांझानियामध्ये आहे. समन्यूसोबत त्याची आई आणि हैदराबादमधल्या इतर महिला गिर्यारोहकही होत्या. या सर्वांसोबत मिळून त्यानं हा पर्वत सर केला. इथे पावसाचे दिवस होते त्यामुळे मार्गात खूपच दगड होते. मला भीती वाटत होती. पायही खूप दुखत होते पण आम्ही मध्ये आराम करून प्रवास करायला सुरूवात केली अशी माहिती समन्यून एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. समन्यूला हा पर्वत सर करण्यासाठी पाच दिवस लागले.

पहाटे तीन वाजल्यापासून आम्ही चालायला सुरूवात करायचो पण काही अंतर कापल्यानंतर शरीरातली ताकद संपायची. इथल्या हवामानाचीही भीती वाटायची पण, छोट्या समन्यूनं धीटपणे हा पर्वत सर केला याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. माऊंट किलीमांजारो सर केल्यानंतर पुढील महिन्यात समन्यू ऑस्ट्रेलियात गिर्यारोहणासाठी जाणार आहे.