जगातील सधन संस्कृतीपैकी मानल्या जाणा-या इजिप्शियन संस्कृतीतील आणखी एका शहराचा शोध लागला आहे. इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाला ७ हजार वर्षांपूर्वी जमीनीखाली गाढल्या गेलेल्या शहराचा शोध लागला आहे.

पुरात्त्व विभागाकडून सुरु असलेल्या या खोदकामात झोपड्यांचे अवशेष सापडले आहेत. तसेच लोखंडापासून बनवलेल्या वस्तू, भांडी आणि पिरॅमिडचे अवशेषही सापडले आहेत. प्राचीन इजिप्तमधल्या अबॉयदस शहराचा हा महत्त्वाचा भाग समजला जातो. येथे या शहाराची नगर रचना करण्यात मोलाचे योगदान देणा-या कामगारांच्या वस्त्या असू शकतात असा तर्क मांडण्यात येत आहे. अबॉयदस ही प्राचीन काळी इजिप्तची राजधानी होती असे अनेकांचे ठाम मत आहे. नव्याने शोधलेल्या या शहरात कदाचित शहरातील प्रमुख अधिका-यांची किंवा पिरॅमिड बांधणा-यांची घरे असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले आहे. तसेच या खोदकामादरम्यान १५ कबर देखील सापडल्या आहे. अबॉयदसच्या राजाच्या कबरेपेक्षाही या कबरींचे आकारमान हे मोठे आहे अशी माहितीही पुरातत्व विभागाने दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी इजिप्तमधल्या कदाचित उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना पुरण्यात आले असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे.

नाईल नदीच्या किना-यावर असलेल्या लक्सर शहरातील सेती मंदिरापासून ४०० किलोमीटर अंतरावर या शहराचा शोध लागला आहे. इजिप्शियन संस्कृती ही जगातील महान संस्कृतीपैंकी एक समजली जाते. नाईल नदीच्या खो-यात वसलेली ही संस्कृती इसवी सन पूर्व ३, १५० च्या सुमारास उदयास आली. या संस्कृतीबद्दल अनेक कोडी अजूनही सुटली नाही. त्यातलीच एक म्हणजे पिरॅमिड. ही पिरॅमिड आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहेत. जगातील सात आश्चर्यांपैकी ही पिरॅमिड एक मानली जातात. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचा पुर्नजन्मावर विश्वास होता. त्यामुळे राजे आपल्यासाठी पिरॅमिड बांधून घेत. त्यांच्या मरणानंतर या पिरॅमिडमध्ये सोने, चांदी ,दास -दासींपासून त्यांच्या उपयोगाच्या वस्तू ठेवल्या जात. नव्याने शोध लागलेल्या या शहरामुळे या संस्कृतीबद्दल आणखी रहस्ये समोर येऊ शकतात. त्याचप्रमाणे या शहरामुळे इजिप्तच्या खालावलेल्या पर्यटन व्यवस्थेला देखील उभारी मिळू शकते अशी आशा वर्तवण्यात येत आहे. २०११ पासूनच इजिप्तची पर्यटन व्यवस्था खालावली होती.