सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपल्या जीवची पर्वा न करता करोनाचा सामना करत आहेत. अशातच एका आजोबांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ७४ वर्षीय आजोबा आपल्या पेन्शनच्या पैशातून मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. पीआयबी जम्मू काश्मीरनं एक त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याचं कौतुक केलं आहे. योग राज मेंगी अस त्या आजोबांचं नाव आहे.

१५ एप्रिल रोजी पीआयबीनं एक ३७ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला. पीआयबीनं त्यांना करोना वॉरिअर असं संबोधलं आहे. त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ६ हजार मास्क तयार करून वाटले आहेत. तसंच आता ते या रकमेतून गरजूंना मोफत अन्नधान्याचं वाटपही करत आहेत, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

प्रसार भारतीनंही यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटला रिट्विट करत अशा नागरिकांचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. कोविड १९ विरोधातील लढ्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या कार्याचं सर्व नेटीझन्सकडून कौतुक होत आहे.