ब्राझीलच्या साओ पोलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन मिनिटांत तब्बल ७२० किलो सोन्याची चोरी झाली आहे. ब्राझीलच्या इतिहासातील ही आजवरची दुसरी सर्वात मोठी चोरी असल्याचे म्हटले जात आहे. आठ बंदुकधारी दरोडेखोरांनी चोरलेल्या या सोन्याची किंमत जवळपास ३० दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे. घडलेली ही घटना विमानतळावरील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

जोओ कार्लोस मिगेल हुएब नामक पोलिस अधिकारी या दरोड्याची चौकशी करत आहेत. त्यांच्या मते ब्राझिलमध्ये संघटित गुन्हेगारीचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यापैकीच एका गुन्हेगारांच्या टोळीने ही चोरी केली आहे. दरोडेखोरांनी पोलिसांचेच कपडे घालून हा गुन्हा केला. विमानताळाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी त्यांनी विमानतळावरील एका कर्मचाऱ्याचा वापर केला आहे. तसेच चोरी केलेला माल ते न्यूयॉर्कमध्ये घेऊन गेले अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी त्यांना दिली आहे.

ब्राझीलमध्ये याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. ब्राझीलमधील सर्वात मोठा दरोडा २००५ साली पडला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी एका बँकेत दरोडा टाकत तब्बल ६७ मिलियन डॉलर लुटले होते. २०१७ मध्ये देखील सॅमसंगच्या कारखान्यातून लाखो डॉलर लुटल्याची घटना घडली होती.