तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत काहीना काही शिकत असता. माणूस कितीही मोठा झाला तरी तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. नवं काही शिकण्याला वयाचं बंधन कधीही नसतं हेचं जगाला दाखवून दिलंय ७५ वर्षांच्या लालरिंगथारा यांनी. आज मिझोराममधल्या शाळेत ते एकमेव ‘तरुण’ विद्यार्थी आहेत. लालरिंगथारा पाचवीत शिकतात. त्यांचे वर्गमित्र त्यांच्या नातवंडांच्या वयाचे असतील पण, लालरिंगथारा मात्र या सगळ्यांसमवेत मिळून मन लावून अभ्यास करतात.

१९४५ मध्ये भारत म्यानमार सिमेजवळील एका छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यानं त्यांच्या आईलाही प्रचंड मानसिक धक्का बसला. वडील एकटेच कमावते असल्यानं घरचा आर्थिक भार आईवर आला. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांची आई शेतमजूरी करू लागली. आईसोबत तेही शेतावर काम करु लागले. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही त्यांना शिकता आलं नाही. शिकून मोठं होण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं. मिझोराममधल्या न्यू रुआईकॉन गावात ते नोकरीच्या शोधात आले. इथल्या चर्चमध्ये ते नोकरी करू लागले. याच काळात त्यांनी शिक्षणही पूर्ण करायचं ठरवलं. मिझो भाषेसोबत ते इंग्रजी भाषेचंही ज्ञान आत्मसात करत आहेत.

शाळेत ७३ वय असणारे ते एकमेव आहेत. या वयात शरीर साथ देणं सोडतं. अनेकजण आजारपणानं अंथरुण धरतात पण, तरीही या वयात लालरिंगथारा यांची शिकण्याची जिद्द कमालीची आहेत. सकाळी शाळेत गेल्यानंतर रात्री ते वॉचमनची नोकरीही करतात.