वयाच्या ७५ व्या वर्षी अनेकजण तब्बेतीची काळजी, पेन्शन आणि निवांत वेळ घालवण्याकडे भर देतात. मात्र पश्चिम ऑस्ट्रेलियामधील एका ७५ वर्षीय आजीबाईंनी नुकताच वाहन चालवण्याचा परवाना मिळवला आहे. एकीकडे या वयामध्ये वृद्ध व्यक्ती तब्बेतीसंदर्भात तक्रारी करताना दिसत असतानाच दुसरीकडे या आजींनी थेट गाडीचे स्ट्रेअरिंग हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गाडी चालवण्याचा परवाना मिळवण्यामागे एक खास कारण आहे.

विनी सॅम्पी असं या आजीबाईचं नाव असून त्या ऑस्ट्रेलियातील पोर्ट हिडलॅण्ड येथे राहतात. ब्रिटनमधील युनीलॅड या वेबासाईटने दिलेल्या वृत्तानुसार, विनी या गाडी चालवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये लागणारा प्राथमिक स्वरुपाचा तात्पुरता परवाना परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. आपल्या आजारी बहिणीला रुग्णालयात नेता यावे यासाठी त्या वयाच्या ७५ व्या वर्षी गाडीचा परवानाही काढला आहे.

खरं तर विनी या तरुण वयातच गाडी चालवण्यास शिकल्या होत्या मात्र त्यांनी कधीच परवाना काढण्यासंदर्भात विचार केला नाही. मात्र अचानक विनी यांची बहीण आजारी पडली आणि त्यांना नियमीतपणे रुग्णालयात जाण्यास अडचण येऊ लागली. त्यामुळेच बहीणीला नियमीतपणे रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी विनी यांनी स्वत: गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ‘मी खूप आधीपासूनच हा परवाना घेण्याचा विचार करत होते. आता कुठे मी मनावर घेऊन तो घेतला असला तरी यासाठी मला खूप उशीर झाल्याचे अनेकजण म्हणतात,’ असं विनी यांनी ‘एनआय टीव्ही’शी बोलताना सांगितले.

वय जास्त असल्याने विनी यांना परवाना मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र त्यांना हिडलॅण्डमधील ब्लवूड ट्री असोसिएशन या संस्थेने मदत केली. सर्व कागदोपत्री पूर्तता आणि इतर मदत या संस्थेने विनी यांना पुरवला. विनी यांनी कधीच कंप्युटर वापरला नसल्याने त्यांची नजर स्पष्ट असून त्यांना चष्मा नाहीय. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांना दूरच्या गोष्टीही अगदी स्पष्टपणे दिसतात. याच कारणामुळे त्या परवाना परिक्षेतील वाहतूक नियमांसंदर्भातील चाचणी सहज उत्तीर्ण झाल्या.