नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी मानवाने निवाऱ्याची सोय केली आहे. मात्र ज्यांच्या निवाऱ्याची सोय नाही अशा भटक्या आणि मुक्या जनावरांना दररोज नैसर्गिक संकटांशी सामना करावा लागतो. यामध्ये अनेक वेळा त्यांना अन्नही उपलब्ध होत नाही. अनेक सामाजिक संस्था किंवा काही व्यक्ती या भटक्या जनावरांसाठी काही ना काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत असतात. या समाजकार्यामध्ये रशियातील एका ९ वर्षाच्या लहान मुलानेही हातभार लावला आहे. विशेष म्हणजे तो जे काम करतो ते पाहून अनेकांना त्याचा हेवा वाटेल.

अनेक वेळा रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पाहिल्यावर आपण त्यांना हुसकावून लावतो. मात्र या भटक्या कुत्र्यांना हुसकावून न लावता त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा, त्यांची काळजी घेणारा Pavel Abramov हा लहान मुलगा त्यांच्यासाठी रोज पेंटींग्स विकून त्याबदल्यात ग्राहकांकडून अन्नपदार्थ घेतो आणि हे पदार्थ भटक्या कुत्र्यांपर्यंत पोहोचवतो.

 

View this post on Instagram

 

Приют Лохматая верностьРад знакомству

A post shared by Pasha Abramov (@pashaabramov1) on


भटक्या कुत्र्यांची अन्नासाठी रोज होणारी परवड पाहून पॅवेलने जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने आईच्या मदतीने ‘काइन्ड पेंटब्रश’अंतर्गंत पेंटींग्स करण्यास सुरुवात केली आणि ती विकू लागला. विशेष म्हणजे या पेंटींग्सच्या बदल्यात तो ग्राहकांकडून पैसे न घेता त्यांना अन्नपदार्थ देण्याची विनंती करतो. ग्राहकांनी अन्नपदार्थ दिल्यानंतर पॅवेल हे पदार्थ घेऊन डॉग शेल्डरमध्ये जाऊन तेथील कुत्र्यांना खाऊ घालतो.

दरम्यान, खास पॅवेलकडून आपल्या पाळीव कुत्र्यांचं चित्र काढून घेण्यासाठी अनेक जण लांबून येतात. जर्मनी, स्पेन या ठिकाणाहूनही अनेक जण येतात. पॅवेल ज्या डॉग शेल्डरमध्ये जातो तेथे जवळपास १०० पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांना ठेवण्यात आलं आहे.