शिकण्याला वय नसतं. तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत काहीना काही शिकत असता. तेव्हा माणूस कितीही मोठा झाला तरी तो विद्यार्थीच असतो. म्हणूनच थायलंडमधल्या ९१ वर्षांच्या आजी आपल्या ज्ञानाचा कुंभ भरत नाही तोपर्यंत शिकतच राहिल्या. गेल्या दहावर्षांपासून अभ्यासात लक्ष केंद्रीत करत नुकतीच या आजींनी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. किमलान जिनाकू असं या आजींचं नाव. त्यांनी मानव आणि कुटुंब विकास या विषयात त्यांनी पदवी संपादन केली.

‘आपण शिकलोच नाही तर वाचणार कसं, आपल्याला ज्ञान कसं मिळणार आणि जर आपल्याजवळ ज्ञानच नसेल तर चारचौघांत आपण नीट बोलणार कसं’ असं या आजी म्हणतात. तेव्हा त्यांनी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली. नुकताच त्यांच्या दीक्षांत सोहळा पार पडला यावेळी थायलँडच्या राजांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. वयाच्या ९१व्या वर्षी पदवी संपादन करून आजींनी एक नवा आदर्श जगासमोर घालून दिला आहे. शिकण्याची आवड असेल तर वयाचं बंधन नसतं हे आजींनी दाखवून दिलं.