प्रत्येक गोष्ट वेळेत करायला हवी, वेळेत गोष्टी घडलेल्या बऱ्या असं आपण नेहमी थोरामोठ्यांकडून ऐकत असतो. काही बाबतीत हा सल्ला खरा असला तरी शिक्षणाच्या बाबतीत मात्र थोडं वेगळं आहे. एखादी गोष्ट शिकायला वय नसतं हे खरं आहे. तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत काहीना काही शिकत असता म्हणून माणूस कितीही म्हातारा झाला तरी वयाच्या शेवटपर्यंत तो विद्यार्थीच असतो. मेक्सिकोत राहणाऱ्या ९६ वर्षांच्या आजी  शरीरानं जरी म्हाताऱ्या झाल्या असल्या तरी त्यांची शिकण्याची जिद्द मात्र कमालीची आहे. वयाची शंभरी गाठायच्या आधी त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.

ग्वॉडलू पलासिऑस आजींचा जन्म मॅक्सिकोमधल्या गरीब कुटुंबात झाला. पोटापाण्यासाठी त्यांनी लहानपणीच आई -वडिलांसोबत शेतात काम करायला सुरूवात केली. तरुणपणी त्या बाजारात मांस, फळं विकून उदरनिर्वाह करू लागल्या. या काळात त्यांना शाळेत जायला मात्र कधीच मिळालं नाही. नंतर लग्न, सहा मुलं, संसार या सर्वात अडकल्यावर लिहण्याचं वाचण्याचं उराशी बाळगलेलं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं. आता त्यांचं वय आहे ९६ वर्षे. या आठवड्यात त्यांच्या शाळेचा पहिला दिवस होता. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी स्वत:चं नाव अक्षरओळख संस्थेत घातलं. तिथे त्या लिहायला वाचायला शिकल्या. अक्षरांची तोंडओळख आणि चार वर्षे अभ्यासात मेहनत केल्यानंतर त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. या आठवड्यात त्यांचा शाळेतील पहिलाच दिवस होता. शाळेचा गणवेश परिधान करून त्यांनी शाळेत प्रवेश केला.

त्या खूपच गुणी विद्यार्थिनी आहेत असं कौतुक त्यांच्या शिक्षकांनी केलं आहे. वयाची १०० पूर्ण होण्याआधी त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि यासाठी हवी तेवढी मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे.