उत्तराखंडमधील दहावीच्या वर्गातील मुलीला मोबाइल गेमच व्यसन लागले. या वेडापायी १५ वर्षीय मुलगी १८ दिवसांत चक्क दहा शहरं फिरली आहे. टॅक्सी ड्रायव्हर 2 असे या गेमचं नाव आहे. दिल्लीमध्ये फिरत असताना पोलिसांना तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना सत्य समजले. दिल्ली पोलिसांनी याबाबत उत्तरखंडमधील पंतनगर पोलिसांना कळवलं आहे. गुरूवारी दिल्लीमधील कमला मार्केटमध्ये ही मुलगी फिरताना दिसल्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी मोबाइल गेममुळे गेल्या १८ दिवसांपासून घरातून बाहेर असल्याचे समोर आले.

पंतनगर येथील पोलीस आधिकारी बरिंदरजीत सिंह म्हणाले की, ‘एक जुलैपासून मुलगी घरात नव्हती. दिल्ली पोलिसांनी तिला कमला मार्केटमध्ये ताब्यात घेतलं. मुलगी आपल्या आईच्या मोबइलवर टॅक्सी ड्रायव्हर-2 (साउथ कोरियन गेम) गेम खेळत होती. त्यानंतर ती गायब झाली. गुरूवारी दिल्ली पोलिसांनी आमच्याशी संपर्क करत संबधित मुलीबाबत माहिती दिली. त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केलं.

उन्हाळ्यामध्ये मुलीनं टॅक्सी ड्रायव्हर 2 गेम डाउनलोड केला होता. फावल्या वेळेत गेम खेळताना त्याची सवय झाली. त्यानंतर तिने मोबाइल गेममधील कॅरेक्टरप्रमाणे(विविध शहरांत) फिरण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने घरातून १२ हजार रूपये चोरी करून उत्तरप्रदेशमधील बरेली शहरात पोहचली. बरेलीतून लखनऊ, जयपूर, उदयपूर, जोधपूर, अहमदाबाद, पुणे, जयपूर, ऋषिकेश, हरिद्वार आणि दिल्लीमध्ये फिरली.

मुलीने पोलिसांना सांगितले की, रात्री एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी आयडी कार्डची गरज भासत होती. त्यामुळे मी रात्रीचा स्लीपरबसने प्रवास केला. बिस्किट, चिप्स आणि पाणी पिऊन १८ दिवसांपासून विविध शहरात प्रवास केला.