गुगलमध्ये काम करणा-या इंजिनअरला किती घसघशीत पगार मिळत असले याची कल्पना तुम्ही करु शकता. घसघशीत पगार आणि इतर कंपन्यांमध्ये न मिळणा-या सुविधा यामुळे येथले कर्मचारी श्रीमंत असतात. मोठे घर, उंची कपडे हवे तेवढे पैसे खर्च करणारे हे कर्मचारी ऐशोआरामात जीवन जगत असतील असे अनेकदा आपण ऐकत असतो. पण गुगलचा एक कर्मचारी असा आहे जो यापैकी काहीच करत नाही. पगार उधळणे तर सोडच पण घसघशीत पगार असूनही तो गेल्या वर्षभरापासून एका ट्रकमध्ये राहत आहे. या कर्मचा-याला वयाच्या तिसाव्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे म्हणूनच त्याचा सारा खटाटोप सुरू आहे.

सिलिकॉन व्हॅलीत गुगलमध्ये काम करणारा इंजिनिअर ब्रँडॉन हा फक्त २४ वर्षांचा आहे. त्याला इतर कर्मचा-यांप्रमाणे घसघशीत पगार आहे. पण हा पगार स्वत:वर खर्च न करता पगारातील ८२ टक्के रक्कमेची तो बचत करतो. ब्रँडॉनने शिक्षणासाठी २२ हजार डॉलरचे शैक्षणिक कर्ज घेतले. जे त्याने जवळपास फेडले आहे. उर्वरित रक्कम मात्र घर, विजेचे भाडे आणि इतर चैनीच्या गरजांवर न उधळता या पैशांची तो बचत करतो.  हे पैसे वाचावे यासाठी ब्रँडॉन वर्षभरापासून एका ट्रकमध्ये राहतो. ट्रकच्या विम्यासाठी त्याला जे पैसे द्यावे लागतात तेवढाच त्याचा खर्च होतो. गुगच्या पार्किंग लॉटमध्ये आपले हे चालते फिरते घर ठेवून तो कामावर जातो. या घरात झोपण्यासाठी एक बेड सोडल्यास फारश्या काहीच सुखसुविधा नाहीत. या सुविधा ट्रकमध्ये आणायच्या झाल्यास ब्रँडॉनला अधिक पैसे खर्च करावे लागतील म्हणून कमी गरजांमध्ये राहण्याचा प्रयत्न ब्रँडॉन करतो.

ब्रँडॉन ब्लॉग लिहितो. त्याला जगभरात प्रवास करायचा आहे. आयुष्यभर कर्मचारी बनून न राहता त्याला देशोदेशी भटकायचे आहे आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पैसे वाचवायचे आहे. जर ब्रँडॉन पुढचे ६ वर्षे आपला ८२ टक्के पगार वाचवण्यात यशस्वी झाल्यास ३० व्या वर्षी निवृत्त होणारा तो अब्जधीश ठरेल.