नेदरलँडमधल्या ६९ वर्षांच्या आजोबांना त्यांचं वय हे तब्बल २० वर्षांनी कमी करायचं आहे. माणूस स्वत:चं नाव, धर्म, लिंग बदलू शकतो मग वय का नाही बदलू शकत? असा साधा प्रश्न या आजोबांना पडला आहे म्हणूनच स्वत:चं वय अधिकृतरित्या वीस वर्षांनी कमी करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

एमिल रेटलबँड यांचं टिंडर या डेटिंग अॅपवर प्रोफाइल आहे. प्रोफाइलवर त्यांनी आपलं खरं वय ठेवलं आहे. मात्र वय पाहून कोणीही प्रतिसाद देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जर मी वय २० वर्षांनी कमी दाखवलं तर मला नक्कीच डेटिंग अॅपवर तरुणी किंवा महिलांचे प्रतिसाद येतील असं मत त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. वय कमी झाल्यानं मला नोकरी मिळेल, घर घेता येईल आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटेल असं एक कारणही एमिल यांनी सांगितलं आहे.

वय अधिकृतरित्या कमी करुन घेण्याचा कोणताही कायदा, नियम सध्या या देशात अस्तित्त्वात नाही, त्यामुळे एमिल यांच्या मागणीवर कोर्टानं कोणताही निर्णय अद्याप दिलेला नाही. एमिल हे प्रेरणादायी वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे. माझं वय ६९ असलं तरी मी ४९ वर्षांच्या गृहस्थासारखा दिसतो असं ते अभिमानानं सांगतात.

एमिल हे वयस्क असल्यानं त्यांना निवृत्तीवेतन मिळतं मात्र जर माझं वय कायदेशीररित्या कमी झालं तर मी निवृत्तीवेतनदेखील सोडायला तयार आहे असंही ते म्हणाले. त्यामुळे आता यावर कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्यासारखं ठरणार आहे.