प्रत्येक घराघरात शौचालय हवेच! यासाठी आपले सरकार आग्रही आहे. वेगवेगळ्या योजना राबवून घराघरात शौचालय बांधण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी सरकारी मदतही मिळते. पण अनेकदा ती मदत लोकांपर्यंत पोहोचतच नाही. पण काही लोक असेही आहेत ज्यांनी कोणत्याही मदतीची वाट न बघता स्वत: घरात शौचालय बांधले. कोणी आपले दागिने विकले, तर कोणी एक एक रूपया जमवून निश्चयाने शौचालय बांधून घेतले. पालघर मधल्या एका गर्भवती महिलेने तर स्वत: राबून आपल्या घरात शौचालय बांधले. या महिलेच्या कष्टांची दखल खुद्द मोदींनी देखील घेतली. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्यात ९० वर्षांच्या चंदना यांचे नाव आवर्जून घेण्यासारखे आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या चंदना यांना आपल्या घरात शौचालय बांधायचे होते. शौचालय बांधण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी सरपंच आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकदा विनंती केली पण तिथून मदत काही मिळेना. पण घरात शौचालय बांधायचंच हा निश्चय त्यांनी पक्का केला आणि आपल्याकडे असलेले पशूधन काळजावर दगड ठेवून विकायचे त्यांनी ठरवले. चंदना यांच्या घरात शौचालय नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना उघड्यावरच शौचालयाला जावे लागे. शौचासाठी त्यांच्या १०२ वर्षांच्या सासूबाई बाहेर जात असताना पडल्या आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यादिवसापासून घरात शौचालय बांधण्याचा निश्चय त्यांनी करून टाकला. यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या बकऱ्या विकल्या आणि त्यातून आलेल्या पैशातून शौचालय बांधले. आपल्या आईने अनेकदा आर्थिक मदतीसाठी सरपंचांकडे धाव घेतली पण त्यांनी मदत केली नाही असा आरोप चंदाना यांचा मुलगा रामप्रकाश यांनी ‘एएनआय’शी बोलताना केला.

पण कोणीही मदत करो अगर न करो जर निश्चय पक्का असेल तर त्यातून मार्ग निघतोच हे ९० वर्षांच्या चंदना यांनी दाखवून दिले.