लहान असताना आपण सर्वांनीच अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मगर आणि माकडाची गोष्ट. या गोष्टीतला माकड आणि मगर हे दोघे खूप चांगले मित्र असतात. माकड मगरीला छान छान फळं आणून द्यायचा आणि मगर त्याला आपल्या पाठीवर बसवून पाण्यात सैर करायला घेऊन जायची. लहानपणी आपल्याला या गोष्टींचं नवल वाटायचं पण मोठं झाल्यावर या गोष्टी प्रत्यक्षात कुठे घडत नाही हे आपल्याला समजायला लागतं. पण असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात कासवांचा एक मोठा समूह पाणगेंड्याच्या पाठीवर बसलेला दिसतोय.

भारतीय वनविभाग अधिकारी सुधा रमण यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाणगेंडा पाण्यात विश्रांती घेत आहे आणि कासवांच्या एक समूह त्या पाणगेंड्याच्या पाठीवर बसला आहे. जेव्हा तो पाणगेंडा उठून उभा राहतो तेव्हा एक एक करून कासव पाण्यात पडतात. शेवटी अगदी थोडेच कासव त्याच्या पाठीवर शिल्लक राहतात. हा व्हिडीओ शेअर करताना सुधा रमण यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. “कधी कधी फुकटचा प्रवास धोकादायकही ठरू शकतो.”

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

सुधा रमण यांच्या व्हिडीओला सातशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर ८९ लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सुधा रमण यांच्या या ट्विटवर कंमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी व्हिडीओच्या खाली मोठ्याने हसणारे इमोजी शेअर केले. एक वापरकर्ता म्हणतो,”हा ड्राइव्हर आणि याची गाडी हे दोन्ही धोकादायक आहेत.” “बसमध्ये उभं राहणाऱ्यांसाठीही मर्यादा आहेत.” अशी टिप्पणी दुसऱ्या वापरकर्त्याने केली आहे. “ज्या कासवांनी आपला ओटीपी दिला नाही त्यांना खाली उतरवण्यात आलंय.” अशी कमेंट तिसऱ्या वापरकर्त्याने केली आहे. तर, “सीटबेल्टशिवाय केलेली धोकादायक सवारी.” अशी प्रतिक्रिया चौथ्या वापरकर्त्याने दिली आहे.

हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की आपल्याला हा व्हिडीओ पाहताना हसू आवरत नाही.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?