कोलंबियामधील एका महिला न्यायाधीशांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सध्या देशामध्ये ही महिला न्यायाधीश अगदी बातम्यांपासून सोशल मीडियापर्यंत अनेक ठिकाणी चर्चेत आहे. क्रिमिनल जज म्हणजेच गुन्हेगारांशी संबंधित खटल्यांवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश विवियन पोलनिया या सध्या वादात सापडण्यामागे कारणही तितकेच विचित्र आहे. कपड्यांवर मिळणाऱ्या ऑफर्ससाठी पोलनिया यांनी स्वत:चे अंतर्वस्त्रांमधील काही फोटो काढून सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले होते. हे फोटो एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर आता प्रश्सानाने आणि न्यायपालिकेशीसंबंधित अन्य न्यायाधीशांनी आक्षेप नोंदवला असून पोलनिया यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पोलनिया दोषी आढळल्यास त्यांना पदावरुन काढून टाकण्यात येऊ शकतं.

एका सन्माननिय पदावर असतानाच पोलनिया यांनी हे कृत्य केलं आहे. या पदाचा समाजामध्ये एक मान, सन्मान आहे. अनेक लोकं खूप आशाने अशा पदावरील माणसांकडे पाहत असतात. मात्र पोलनिया यांनी कशाचेच भान न ठेवता अशाप्रकारचे आक्षेपार्ह आणि खूपच बोल्ड फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले. यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होण्यास हातभार लागला आहे असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. कोलंबियामधील कैकटा शहरात काम करणाऱ्य पोलनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे फोटो एका वृत्तपत्राने छापले. ‘बहुआयामी न्यायाधीश’ असा उल्लेख करुन त्यांचे हे फोटो छापण्यात आले होते.

पोलनिया यांनी एका मुलाखतीमध्ये आपण न्यायाधीश म्हणून कार्यरत असलो तरी व्यायामाची आवड जोपसली होती. पोलनिया सोशल नेटवर्किंगवर स्वत:चे व्यायाम करतानाचे अनेक फोटो पोस्ट करायच्या. त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स वाढण्याबरोबरच कपड्यांच्या काही कंपन्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सोशल नेटवर्किंगवरील प्रमोशनसाठी चांगल्या ऑफर दिल्या. पोलनिया यांनीही इन्टाग्रामवरील आपल्या विवियनपोलनियाएफ (vivianpolaniaf) या हॅण्डलवरुन स्वत:चे अनेक फोटो पोस्ट केले होते. सध्या चौकशी सुरु असल्याने त्यांनी स्वत:चे अकाऊंट डिअॅक्टीव्हेच केलं आहे.

ही मुलाखत छापून आल्यानंतर न्यायाधीशांच्या वर्तवणुकीवर देखरेख ठेवणारी आणि न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश नियुक्त करणाऱ्या जजशिप सुपीरियर काउन्सिल सेक्शनने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. पोलनिया यांनी नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं काऊन्सिलचं म्हणणं आहे. आपल्या खासगी तसेच सामाजिक जिवनामध्ये न्यायाधीश म्हणून वावरताना त्यांनी असं कृत्य करणं योग्य नाही असंही काऊन्सिलने म्हटलं आहे. पोलनिया यांचे इन्स्टाग्रामवर ९० हजारहून अधिक फॉलोअर्स होते.