उद्या ८ मार्च दरवर्षी या दिवशी ‘जागतिक महिला दिवस’ साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. त्यात यंदाच्या महिला दिनाची थीम ही ‘Women in Leadership’ म्हणजेच महिलांच प्रत्येक गोष्टीतील योगदान आणि त्यांनी केलेले नेत्तृत्व. ही थीम करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ठेवण्यात आली आहे. कारण एवढ्या कठीण परिस्थितही अनेक महिला या अनेक गोष्टींच नेत्तृत्व करत आहेत. त्यातच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून एक महिला कशा प्रकारे सगळ्या गोष्टींचे नेत्तृत्व करते हे दिसत आहे.

या व्हिडीओत एक महिला कॉन्स्टेबल तिच्या बाळाला कडेवर घेऊन ड्यूटी करताना दिसत आहे. तिने तिच्या बाळाला कडेवर घेतले असून भर उन्हात ट्रॅफिक कंट्रोल करताना ती महिला कॉन्स्टेबल दिसत आहे. या महिला कॉन्स्टेबलचे नाव प्रियांका आहे.हा व्हिडीओ चंदीगढचा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ गगनदीप सिंग या ट्विटर युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक आणि रिट्विट केले आहे.

हातात चिमुकलं बाळ घेवून ऊन, वारा, वाहनांचा कर्कश आवाज, प्रदुषण अशा सर्व समस्या असताना ही महिला शांतपणे आपलं कर्तव्य बजावत आहे. यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिचे कामासाठी समर्पण पाहून कौतुक केले आहे. तर अनेकांनी बाळाला घरीच ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

बर्‍याच नेटकऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सल्ला दिला की एखादी अधिकारी तिच्या मुलाला कडेवर घेऊन ड्युटी का करत आहे या कडे पाहा.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रियांका आणि आणखी एका पोलीस अधिकारीला सकाळी ८ वाजता ड्युटीवर बोलवलं होतं. मात्र, एका अधिकाऱ्याला ते दोघे ही उपस्थित नसल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रियांका आणि त्या अधिकाऱ्याची ड्युटी तिथे लावली. प्रियांकांचा वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वादही झाल्या होता आणि त्यामुळेच ती तिच्या बाळाला घेऊन ड्युटीवर गेली.”