उत्तुंग इमारत चढण्याचं धाडस करणारा हा रॅकून सध्या ऑनलाइन सेनसेशन ठरला आहे. तब्बल २० तासांची मेहनत घेऊन या प्राण्यानं २५ मजल्यांची इमारत सर केली आहे. हा प्राणी मुळात इमारतीवर कोणत्याही आधाराशिवाय चढला कसा याचंच सर्वांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. एखाद्या प्राण्यानं इमारतीवर चढण्याची ही पहिलीच घटना असेल. सुदैवानं यात प्राण्याला कोणतीही इजा झाली नाही.

मंगळवारी पहाटे या प्राण्याला इमारतीच्या बाहेरील भिंत चढताना एका जोडप्यानं पाहिलं होतं. कदाचित पायांची पकड निसटून हा प्राणी स्वत:चा जीव गमावेल की काय याचीच भीती त्यांना वाटत होती. त्यांनी शिडी लावून या प्राण्याला जमीनीवर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही यश आलं नाही. आपल्या चारही पायांची पकड भिंतीवर घट्ट धरत तो अखेर इमारतीच्या छतावर पोहोचण्यास यशस्वी झाला. दुसऱ्यादिवशी पहाटे हा प्राणी इमारतीच्या छतावर पोहोचला. यावेळी वन्यजीव अधिकाऱ्याचा चमू टेसेरवर उपस्थित होता. या रॅकूनला वाचवून नंतर त्याला सुरक्षितठिकाणी सोडण्यात आलं आहे.

या इटुकल्या प्राण्याच्या हिंमतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे दोन दिवस #mprracoon हा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसून आला.