रस्ता आपल्याच मालकीचा आहे असं समजून चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करणारे चालक काही जगाच्या पाठीवर नवे नाहीत. अशा चालकांवर कारवाई करण्यात येते पण, काहीजण कारवाईला न भीता रस्त्याच्या कडेला अगदी बिंधास्त गाड्या पार्क करून निघून जातात. आपल्यामुळे वाहतुकीची कोंडी होतोय, इतरांची गैरसोय होते याचा क्वचितच फरक एखाद्याला पडतो. पण अशा लोकांना चीनमधल्या काही अधिकाऱ्यांनी जन्माची अद्दल घडवली आहे.

एका चालकानं बस स्टॉपच्या समोरच आपली गाडी उभी केली. यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होत होती. या समस्येवर आपल्या पद्धतीनं मार्ग काढण्यासाठी बस स्थानकावरील काही अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी चक्क क्रेन मागवली आणि क्रेनच्या साह्यानं गाडी उचलून इमारतीच्या छतावर ठेवली. काही स्थानिकांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पण, या चालकाला नंतर त्याची गाडी मिळाली की नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही.

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर अशा पद्धतीनं कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही अशा चालकांना धडा शिकवण्यात आला होता. फ्रान्समध्ये तर गेल्यावर्षी एक मोहीम सुरू करण्यात आली होती. तिथल्या स्थानिकांनी अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांच्या गाड्या चक्क गिफ्ट रॅपिंग पेपरनं बांधल्या होत्या.