मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण अनेकदा म्हणतो. बालपणी असणारा तो निरागसपणा आपण जसजसे मोठे होत जाऊ तसा कुठेतरी हरवत जातो. लहानपणी ना धर्म कळतो, ना जात कळते. नेमकी हीच गोष्ट दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वडील मशिदीत नमाज पठण करत असताना मुलगी वडिलांच्या पाठीवर चढली आणि जणू काही आपण घरातच आहोतच अशा पद्धतीने वडिलांसोबत खेळू लागली. हा गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्रकार स्मिता शर्मा यांनीदेखील ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून, ‘रविवारच्या कंटाळवाण्या मतदानादिवशी हा गोंडस व्हिडीओ आला आहे. इशान वानी यांनी जामिया मशिदीत हा व्हिडीओ शूट केला’, असं सांगितलं आहे.

काश्मीरमधील जामिया मशिदीत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत मशिदीत काहीजण नमाज पठण करत असताना अचानक एक लहान मुलगी धावत येते आणि वडिलांच्या खांद्यांना पकडून पाठीवर खेळू लागते. हा गोंडस व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत. २४५५ जणांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.