सौदी अरेबियातील जेदाहमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे आयोजीत करण्यात आलेल्या जेदाह स्प्रिंग फेस्टिव्हलमध्ये सिंहाच्या हल्ल्यात एक लहान मुलगी जखमी झाली आहे. काही मुलांना सिंहाच्या छाव्यासोबत खेळण्यासाठी एका पिंजऱ्यात सोडण्यात आलं होतं. ही मुलं बिंधास्त छाव्यासोबत खेळत होती पण नंतर मात्र त्यानं या पिंजऱ्यात असणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. त्यामुळे एकच गोंधळ माजला. त्यानंतर या सिंहाच्या प्रशिक्षकानं धाव घेत त्याच्या तावडीतून या मुलीची सुटका करुन घेतली आहे. पण या हल्ल्यात ती मात्र जखमी झाली आहे.

सौदीमध्ये सिंह, चित्ता यांसारखे प्राणी पाळणारे अनेक उच्चवर्गीय आहेत. या फेस्टिव्हलमध्ये आलेल्या अनेक मुलांना मनोरंजनासाठी सहा महिन्यांच्या छाव्याच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं. लहान मुलं छाव्यासोबत खेळतही होती. दुदैवानं यावेळी एक प्रशिक्षक सोडला तर मुलांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी येथे घेण्यात आली नव्हती. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशिक्षकानं दिलेल्या माहितीनुसार हा सिंह लहान मुलीनं लावलेल्या फुलपाखराच्या क्लिपला पाहून आकर्षित झाला होता आणि त्यातून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सिंहाचा हल्ल्यात या मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्याचंही समजत आहे.