प्रत्येक हेअर स्टाईलिस्टची केस कापण्याची वेगळी अशी स्टाईल आहे. त्यातून हल्ली सोशल मीडियावर तर असे काही एकापेक्षा एक भन्नाट हेअर ड्रेसर तुम्हाला पाहायला मिळतील ज्याची केस कापण्याची पद्धत पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कोणी कुऱ्हाडीने केस कापतो, तर कोणी पेटत्या मेणबत्तीचं तंत्र वापरून केस कापतो. याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आपण अनेकदा पाहिले असतील. असाच एक हेअर ड्रेसर त्याच्या केस कापण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आलाय. हा हेअर ड्रेसर एकाचवेळी चक्क १५ कात्र्या वापरून केस कापतो. ‘स्पाईक’स्टाईल करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

पाकिस्तानचा असलेला हा ३३ वर्षीय हेअर ड्रेसर सादिक अली आपल्या अनोख्या केस कापण्याच्या स्टाईलमुळे सेलिब्रिटींमध्ये प्रसिद्ध आहे. पाकचे अनेक किकेटर्स आपल्याकडे केस कापण्यासाठी येतात असा दावा त्यानी केलाय. विशेष म्हणजे यासाठी तो फक्त १२५ रुपयांच्या असापास शुल्क आकारतो. ही कला शिकायला अलीला जवळपास ५ वर्षे लागली. काहीवर्षांपूर्वी त्यांने एका चीनी हेअर ड्रेसरला १० कात्र्या घेऊन केस कापताना पाहिलं होतं. आपण देखील असंच काहीतरी हटके करावं अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि अनेक वर्षे प्रयत्न करून त्यानं या कलेवर प्रभुत्व मिळवलं.