दुर्मिळ आणि तितकाच विचित्र दिसणारा ‘सनफिश’ मासा ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आला आहे. ‘सनफिश’ हा मासा क्वचीतच नजरेस पडतो, इतर माश्यांच्या तुलनेत आगळा वेगळा दिसणारा हा मासा पाहून मश्चिमारदेखील गोंधळात पडले होते.

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील कुराँग नॅशनल पार्क परिसरात ‘सनफिश’ वाहून आला होता. लाकडाचा ओंडका असल्याचं वाटून सुरूवातीला मश्चिमारांनी मृतदेहाकडे दुर्लक्ष केलं मात्र हा मृतदेह काहीसा माशासारखा भासत असल्यानं मश्चिमारांमध्ये गोंधळ उडला. ‘यापूर्वी आम्ही कधीही अशा प्रकारचा समुद्री जीव पाहिला नव्हता किनाऱ्यावर व्हेल किंवा सील मृतावस्थेत वाहून येण्याचे प्रकार अनेकदा घडतात मात्र हा मासा कधीही पाहिला नव्हता.’ अशी माहिती एका स्थानिक मश्चिमारानं दिली.

‘हा मासा वजनानं खूपच जड आणि त्याची त्वचा गेंड्याच्या त्वचेसारखी जाड होती’ अशी माहिती दुसऱ्या मश्चिमारानं दिली. सनफिशला ‘मोला मोला’ म्हणूनही ओळखलं जातं, 2017 मध्ये या माशाचा शोध लागला.

 

जेलीफिश हे प्रमुख खाद्य ‘सनफिश’चं आहे. हे मासे साधारण ६ फूट लांबीचे असतात आणि त्यांचं वजन एका चारचाकी वाहनाएवढं असतं. या माशांना सूर्यप्रकाशात येणं आवडतं म्हणून त्यांना ‘सनफिश’ म्हटलं जातं.