जपानमध्ये एका छोट्याशा गोगलगाईमुळे संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प पडल्याचा प्रकार समोर आला आहे. गोगलगाईमुळे वीज पुरवठा ठप्प झाला होता, ज्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली अशी माहिती देण्यात आली आहे. ३० मे रोजी ही घटना घडली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने जवळपास २६ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. १२ हजार प्रवाशांना याचा फटका बसला. रेल्वे ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, गोगलगाय रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या विद्युत ऊर्जा उपकरणात प्रवेश करण्यात यशस्वी झालं होतं. यामुळेच हा सगळा प्रकार घडला.

जपानमधील वाहतूक सेवा नेहमी वेळेवर असते. पण अशा पद्दतीने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. वीज पुरवठा खंडित झाल्याने १२ हजार प्रवासी आपल्या इच्छितस्थळी पोहोचू शकले नाहीत. बराच वेळ प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने २६ ट्रेन्स रद्द करण्याची नामुष्की ओढवली. यामुळे इतर सेवाही उशिराने सुरु होत्या.

हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला एखाद्या जिवंत किड्यामुळे समस्या निर्माण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नंतर दुसरं काही नाही तर एक मृत गोगलगाय यासाठी जबाबदार असल्याचं निष्पन्न झालं.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विद्युत उपकरणात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर गोगलगाईचा मृत्यू झाला. ‘अनेकदा हरिण आणि ट्रेनची धडक झाल्याने समस्या निर्माण होत असतात. पण गोगलगाईमुळे समस्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे’, असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.