चोरीच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील मात्र पश्चिम बंगालमधील एका चोरीची सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चा आहे. येथील बर्द्धमान जिल्ह्यामध्ये एका तोराने चोरी केलेला महागडा फोन मालकाला परत आणून दिल्याची विचित्र घटना समोर आली आहे. बरं चोराने हा फोन परत करण्यामागील कारण म्हणजे फोन चोरी केल्यानंतर आपल्याला हा महागडा फोन वापरता येत नाहीय हे चोराच्या लक्षात आलं. त्यामुळे या चोराने मूळ मालकाला फोन कॉलवरुन चोरलेला मोबाईल परत करण्याची इच्छा व्यक्त केली. जो फोन मला वापरता येणार नाही तो ठेऊन मी काय करणार. त्यामुळे तुम्ही माझ्याकडून हा फोन ताब्यात घ्या असं या चोराने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व वर्द्धमान जिल्ह्यातील जमालपूर येथील एका मिठाईच्या दुकानामध्ये मोबाईलचा मालक मिठाई घेण्यासाठी आला होता. खरेदी केल्यानंतर तो आपला ४५ हजारांचा मोबाईल दुकानाचा विसरला. त्यानंतर त्याच दुकानात आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने हळूच हा फोन दुकानदाराच्या लक्षात येण्याआधी खिशात टाकला आणि तिथून पळ काढला. आपला फोन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मालकाने पोलिसांकडे तक्रार केली.

एवढा महाग मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो पुन्हा मिळणार नाही असचं सर्वांना वाटत होतं. मात्र मालकाने त्याच्या क्रमांकावर फोन केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोराने फोन उचलला आणि मालकाच अनेक गोष्टी ऐकवल्या. आपल्याला हा फोन वापरता येत नाहीय. तुम्ही माझ्याकडून हा फोन पुन्हा आपल्या ताब्यात घ्या असं चोराने सांगितल्यावर मालकालाच आश्चर्य वाटले. मालकाने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

मोबाईल फोनचा मालक पोलिसांबरोबरच या तरुणाच्या घरी पोहचला आणि त्याने मोबाईल ताब्यात घेतला. चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेण्याची तयारी केली असता मोबाईल मालकाने या तरुणाला अटक करु नका, माझी याच्याविरुद्ध कोणताही तक्रार नाही असं सांगतले. पोलिसांनीही या तरुणाला समज देऊन सोडून दिल्याचे न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.