भोपाळमधील जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी मोठी होती की ३० ते ३५ फूट उंच दगड उडून खाली पडल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणताही मोठा अनर्थ घडला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरजवळील डुंडी येथे कटनी-बीनासाठी तिसरी रेल्वे लाईन तयार करण्याचं काम सुरू आहे. एका मोठ्या डोंगरामधून रेल्वे ट्रॅक तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी स्फोटकांच्या मदतीनं डोंगराला भोगदा पाडायचा होता. त्यामुळे स्फोट करण्यात आल्याचं म्हटले जाते. पण हा स्फोट इतका भयंकर होता की घटनास्थळापासून दगड उंच उडून ३० ते ३५ फूट लांब जाऊन पडले.

स्फोट झाल्यानंतर दगड उडून ओव्हरहेड वायरवरला लागले. त्यामुळे ओव्हरहेड वायरचे मोठ्या प्रमाणावर नुकासान झाले आहे. रेल्वे स्थानाकावर उभा असलेल्या रेल्वेमध्येही दगड पडले. सुदैवानं या ट्रेनमध्ये कुणी प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.


जबलपूर रेल्वे झोनच्या सीपीआरओ प्रियांका दीक्षित या घटनेबद्दल म्हणाल्या की, रेल्वेच्या कामासाठी ज्या डोंगराला स्फोटाने उडवण्यात आलं, हे काम करणारी कंपनी ही अनुभवी आहे. डोंगरावर विस्फोट संपूर्ण नियोजनानंतर करण्यात आले. वेगाने झालेल्या स्फोटामुळे ओव्हरहेड व्हायरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निश्चित काळजी घेण्यात येईल.