अनेक ठिकाणी असलेली आधारची सक्ती आणि त्याला असलेला सामान्यांचा विरोध असं चित्र  देशांत काही नवं नाही. पण हेच आधारकार्ड विक्रेत्याला दाखवलं आणि तुम्हाला घसघशीत सूट मिळाली तर?

कर्नाटक सिल्क इण्डस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेडनं १५ ऑगस्टनिमित्त ग्राहकांना म्हैसूर सिल्क साड्यांवर घसघशीत सूट दिली आहे. मात्र यासाठी ग्राहकांनी आपलं आधारकार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. म्हैसूर सिल्क  साड्या महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. या साड्या कर्नाटकची शान आहेत पण, या साड्यांची किंमत मात्र सर्वसमान्यांना न परवडणारी अशीच आहे. मात्र ‘स्वातंत्र्य दिना’चं निमित्त साधून या साड्यांवर मोठी सवलत देण्यात आली आहे. १५ ते ७ हजारांच्या साड्या केवळ चार हजारांच्या आसपास ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्य महिलांनीही या साड्या विकत घ्याव्या असा हेतू सवलत देण्यामागे आहे. मात्र या साड्या विकत घेताना आधारकार्ड बंधकारक करण्यात आलं आहे. या सवलतीचा कोणत्याही ग्राहकांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी आधारकार्ड सक्ती करण्यात आली आहे. तसेच एकदा साडी विकत घेतल्यानंतर पुढचे काही वर्षे कमी किंमतीत एखाद्या ग्राहकांनं साड्या विकत घेऊ नये यासाठी आधारकार्डची विचारणा ग्राहकांकडे  केली  जात आहे अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री महेश यांनी दिली.