हिंदी वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना करणारी ही टिप्पणी महिला अँकरने केल्याचं या व्हिडीओत दिसतंय. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून संबंधित महिला अँकरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात असून टीकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अँकरने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पोहोचले होते. जेव्हा हे वृत्त चॅनलवर प्रसारीत करण्यात आलं त्यावेळी चॅनलमधील ‘पीसीआर’ टीमकडून अँकर अंजना ओम कश्यप यांचा माइक ऑन राहिला होता. पण, अंजना यांना याबाबतची कल्पना नव्हती. त्यावेळी चॅनलवर एकीकडे आदित्य ठाकरेंची दृष्य प्रसारीत होत असतानाच , “ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, लिखकर रख लीजिए” असं विधान अंजना ओम कश्यप यांनी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर, शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाव न घेता अंजना ओम कश्यप यांच्यावर निशाणा साधला. ‘कोण काय सिद्ध होईल हे येणारा काळ ठरवेल. पण काही लोकांनी तर भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे. रस्त्यावरील पोपट देखील पैसे घेऊन भविष्यवाणी करतो’, अशा परखड शब्दांमध्ये प्रियंका यांनी अंजना यांना सुनावलंय.

त्यानंतर, रात्री उशीरा स्वतः अंजना ओम कश्यप यांनी याबाबत खुलासा केला. “आदित्य ठाकरेंसंदर्भातलं माझं वक्तव्य मला परिस्थितीचं नीट आकलन न झाल्यामुळे घडलेली चूक होती. परंतु त्यावर द्वेषपूर्ण प्रतिक्रिया उमटल्या. कुठल्याही अंगानं माझ्याकडून व्यक्त झालेलं मत चॅनेल अथवा नेटवर्कचं नाही” असं स्पष्टीकरण अंजना यांनी दिलं आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, शिवसेनेकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.