आनंद महिंद्रा ट्विटरवर कायम अॅक्टीव्ह असतात. वेगवेगळे फनी ट्वीट करत ते कायमच ट्विपल्सचे लक्ष वेधून घेतात. नुकतेच त्यांनी तरुणांना आवाहन करणारे एक ट्विट केले असून या ट्विटला नेटीझन्सकडून मोठी पसंती मिळत आहे. जगभरातील युजर्सचा डेटा लिक झाल्याच्या कारणावरुन सध्या फेसबुक जोरदार चर्चेत आहे. फेसबुक हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरीही ही परदेशी कंपनी आहे. अशाचप्रकारची भारतीय कंपनी असायला हवी असे मत महिंद्रा यांनी आपल्या ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे भारतातील कोणी तरुण सोशल मीडिया कंपनी काढण्यास उत्सुक असतील तर त्यांना मी आर्थिक सहाय्य करण्यात तयार आहे असे महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

त्यामुळे भारतीय तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ६२ वर्षीय महिंद्रा यांनी केलेले ट्विट मार्गदर्शक ठरु शकते. जी कंपनी विस्तारीत स्वरुपात, प्रोफेशनल स्तरावर भारतात चालवली जाईल अशी कंपनी नक्की नाव कमावेल आणि देशाला त्याची गरजही आहे असे त्यांच्या ट्विटमधून प्रतिध्वनीत होत आहे. जे तरुण उत्तम संकल्पना घेऊन पुढे येतील त्यांना निश्चितच महिंद्रा कंपनीकडून चांगले आर्थिक सहाय्य मिळू शकेल. महिंद्रा अशाप्रकारे वेगवेगळे ट्विट करुन कायमच समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रोत्साहीत करत असतात. त्यामुळे आताचे त्यांनी केलेले ट्विट ही भारतीय तरुणांसाठी खऱ्या अर्थाने उत्तम संधी असेल.

महिंद्राच्या बोलेरो गाडीत या महिलेने फुड सेंटर उभारले असल्याचा एक व्हिडिओ याआधी व्हायरल झाला होता. अनोख्या फूड सेंटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होता. त्यानंतर महिंद्रा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी थेट या महिलेला व्यवसायात मदत करण्याची तयारी दाखवली होती. याबरोबरच मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या किसान मोर्चा संदर्भातील त्यांचे ट्विटही व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले होते तसेच त्यासोबत जोडलेले २ फोटोही अतिशय समर्पक होते.