News Flash

Video: मुंबईतील जंगलांबद्दलचे राज ठाकरेंचे ब्लू प्रिंटमधील भाषण व्हायरल

आरे प्रकरणानंतर राज यांच्या ब्लू प्रिंट प्रेझेंटेशनचा व्हिडिओ व्हायरल

राज ठाकरे

आरे येथील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यानंतर लगेचच प्रशासनाने एका रात्रीत काही शे झाडे तोडली. यावरुन मागील दोन दिवसांपासून पर्यावरणप्रेमी आणि प्रशासनामध्ये वाद सुरु आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर रविवारी रात्री उशीरा जामीन मिळाल्यानंतर सोडून दिले. मुंबईतील आरे वृक्षतोडप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून आज (७ ऑक्टोबर) सकाळी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्या सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. असे असतानाच सोशल नेटवर्किंगवरही या वृक्षतोड प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहे. अनेकांनी प्रशासनाच्या या कारवाईला विरोध केला आहे. यासंदर्भातील दोन्ही बाजूंची भूमिका मांडणारे अनेक व्हिडिओ, फोटो आणि लेख व्हायरल झाले आहेत. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या ब्लू प्रिंटमधील व्हिडिओही व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी मुंबईमधील वनक्षेत्राची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उदाहरण देऊन स्पष्ट केलं होतं.

मनसे समर्थकांच्या अनेक सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन राज ठाकरेंनी त्यांच्या ब्लू फ्रिंटमध्ये मांडलेल्या शहरातील वनसंपदेबद्दलच्या मुद्द्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅट येथील सेंट्रलपार्कच्या उदाहरणासहीत मुंबईतील बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संवर्धन करण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘परदेशातलचं काय ते चांगलं असं नाहीय. माझं म्हणणं एवढचं आहे की चांगलयं ते स्वीकारायला काय हरकत आहे’ असं सांगत राज यांनी न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. ‘एक उत्कृष्ठ केस स्टडी आहे न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कची. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटमध्ये शहराच्या मध्यभागी हे पार्क आहे. ते सुरु झालं १८५७ साली. ७७८ एकरात पसरलं आहे. म्हणजेच मुंबईतील शिवाजी पार्कमधील २८-३० मैदाने बसतील एवढं. हे पार्क नागरिकांनीच सुरु केलं आणि त्याचं सौंदर्य राखलं. हे पार्क आजही त्याचं सौंदर्य टिकवून आहे. यावर कुण्या एकाची मालकी नाही की अतिक्रमण नाही. येथे दाट झाली आहे. तळं आहे, प्राणीसंग्रहालय आहे. पक्षीनिरिक्षण केंद्र आहे. वर्दळीच्या भागात लोकांना हवी असणारी एक शांतता आहे. एवढ्या मोठ्या पार्कचं व्यवस्थापन कोणतीही सरकारी यंत्रणा करत नाही. सेंट्रल पार्क कॉन्झरव्हन्सी ही संस्था करते. हे होतं कारण ते पार्क लोकांनी उभारलं आहे,’ असं राज या व्हिडिओमध्ये सांगतात.

पुढे याच पार्कचा संदर्भ घेऊन आपल्याकडील शहरांमधील वनक्षेत्राच्या परिस्थितीचे वास्तव त्यांनी या व्हिडिओतून दाखवले आहे. यासाठी त्यांनी मुंबईतील बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उदाहरण घेतले आहे. ‘अमेरिकेतील सेंट्रल पार्कच्या तुलनेत आपल्याकडे काय आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईला सुरु होतं आणि घोडबंदरला संपतं. १०४ चौरस किलोमीटर इतकं आहे. ३० सेंट्रल पार्क बसतील एवढ्या अवाढव्य जागेत आहे. न्यूयॉर्कला हे उभारावं लागलं मुंबईच्या पदरात निर्गाने टाकलं. पार्कला चारही बाजूने वाळवी लागल्यासारखं बिल्डींगने जंगलाला पोखरलं आहे. बिल्डर जंगलाला ओरबाडतायत. जंगल आक्राळास्थ आहे तिथले प्राणी आसरा शोधतायत. बिबळ्या घरात शिरला असं आपण ओरडतो. पण आपण त्यांच्या घरात शिरलोय. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली कुठच्याही परवानग्या अडवून ठेवणारं वनखातं इथे मात्र डोळे मिटून बसलयं,’ अशी टीका राज यांनी या व्हिडिओमधून केली होती. वनविभागाच्या जागांवर अक्षरशः बलात्कार होतोय असंही राज या व्हिडिओत म्हणाले होते.

‘वनविभागाच्या अनेक जमीनी सरकारी आशिर्वादाने ओरबाडल्या जातायत हे सांगताना एरियल व्ह्यूजूअल्स दाखवतात. कारण इथे मुंबईकर लक्ष ठेवतं नाही. न्यूयॉर्कमध्ये तेथील नागरिक शहरातील जंगलावर लक्ष ठेवतात. इथं सरकारनं बिल्डर आणि खाणमाफीयांना जंगले आंदण दिली आहेत. अशी जंगलं सुंदर ठेवणे शक्य आहे. आपल्याला दृष्टीकोन बदलायला हवं त्या जंगलांना आपलं मानायला हवं असं झाल्यास ही जगातील सर्वोत्तम पार्क म्हणून पर्यटनस्थळे म्हणून विकसित होतील,’ असा विश्वास राज यांनी या व्हिडिओत व्यक्त केला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबरोबरच राज यांनी या व्हिडिओमध्ये कल्याण डोंबिवलीमधील शिळफाट्याजवळची जमीन, नवी मुंबईतील वनविभागाचे डोंगर अशी अनेक उदाहरणे वनसंपत्तीवरील संकट आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास दाखवण्यासाठी दिली होती.

दरम्यान, आरे प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपा सरकारला फैलावर घेतल्याचे चित्र दिसत आहे. तर सरकारने सर्व गोष्टी या कायद्यानुसार होत असल्याचे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 10:49 am

Web Title: aarey forest what raj thackeray said in blue print about forest in mumbai scsg 91
Next Stories
1 ठाण्यात ‘इअरफोन’मुळे थरारनाट्य…तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी
2 पुढच्या वर्षी नोकरदारांसाठी कामच काम; हक्काच्या अनेक सुट्या जाणार
3 … त्यांची नजर काहीतरी शोधत होती; त्यांचा निवारा उद्ध्वस्त झाला होता
Just Now!
X