जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डीव्हिलियर्सने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३४ वर्षांच्या डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकूण 420 सामने खेळताना २० हजाराहून जास्त धावा केल्या. यामध्ये ४७ शतकांचा समावेश आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वीच डीव्हिलियर्सच्या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे, तर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर आपल्याला आता थकवा जाणवत आहे. शिवाय, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्यामुळे आपण क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे डीव्हिलियर्सने म्हटले आहे. हा निर्णय अत्यंत कठीण होता. मी त्यावर दीर्घकाळ विचार केला. क्रिकेटमध्ये वरच्या स्तरावर खेळत असतानाच निवृत्त व्हायचे असे मला वाटत होते, असंही डीव्हिलियर्सने म्हटलं.

क्रिकेटच्या मैदानावर एबी डिव्हिलियर्स हे नाव उदयास आलं तेव्हापासूनच त्याचा असाधारण खेळ पाहून त्याच्याबद्दल विविध गोष्टी सांगितल्या जायच्या.  त्याच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर आता पुन्हा अशा कथांचं पीक आलं आहे. एबी डीव्हिलियर्स हा स्विमिंग,  रग्बी, फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक्स इत्यादी खेळांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळला असून त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत, अशा एकाहून एक गोष्टी त्याच्याबद्दल ऐकायची सवय क्रिकेट चाहत्यांना झाली आहे. पण खुद्द एबी डिव्हिलियर्सनं त्याच्या आत्मचरित्रामध्ये आपल्याबाबतच्या या अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एक नजर मारुया त्याच्याबाबतच्या अफवांवर आणि जाणून घेऊया काय आहे सत्य.

अफवा – तो दक्षिण आफ्रिकेचा अंडर-19 बॅडमिंटन चॅम्पियन होता.

सत्य – मी शाळेत असताना कधीच बॅडमिंटन खेळलेलो नाही. माझ्या संपूर्ण जीवनात मी बॅडमिंटनचा केवळ एकच सामना खेळलो, तोही मजा म्हणून.  हा सामना मी मार्क बाउचरसोबत खेळलो होतो.

अफवा – राष्ट्रीय ज्युनियर हॉकी संघात निवड

सत्य – हायस्कूलमध्ये मी फक्त एक वर्ष हॉकी खेळलो, पण राष्ट्रीय टीममध्ये माझी कधीच निवड झाली नाही. तसंच निवड व्हायच्या जवळही मी कधी पोहोचलो नव्हतो.

अफवा – राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल संघात निवड

सत्य – फूटबॉलची एकही मॅच मी खेळलेलो नाही. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये मी फक्त फूटबॉलला किक मारायचो, तेवढंच.

अफवा – दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनियर रग्बी संघाचा कर्णधार

सत्य – मी कधीही रग्बीमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलेलं नाही, त्यामुळे कर्णधारपदाचा तर संबंधच नाही.

अफवा – पोहोण्याचे सहा शालेय विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर

सत्य – प्राथमिक शाळेत असताना पोहोण्याचा एक विक्रम मी केला होता, याव्यतिरिक्त काही नाही.

अफवा – दक्षिण अफ्रीकाच्या ज्युनियर डेव्हिस कप टेनिस टीमचा सदस्य

सत्य – तरुण असताना मी टेनिस खेळायचो आणि मला टेनिस आवडायचंही. माझ्या वयोगटात मी नेहमीच एक क्रमांकावर असायचो.

अफवा – एक उत्तम गोल्फ खेळाडू

सत्य – १५ वर्षांचा असेपर्यंत मी गोल्फ खेळायचो पण वेळ मिळत नसल्याने तेही सोडून दिलं.