चोरी, दरोडा वगैरे प्रकार म्हटला की धडकी भरते. रात्री- अपरात्री रस्त्यामध्ये सुरा दाखवत आपल्याला लुटणारा माणूस वगैरे आठवला की जाम भीती वाटते. पण जगात असेही काही चोर आहेत की ज्यांनी चोरीचा प्लॅन तर बनवला पण प्रत्यक्षात ते एवढया मूर्खपणे वागले की त्यांना पकडणाऱ्या पोलिसांनाही हसायला आलं

१. अयोग्य टार्गेट 

चोरी करण्यासाठी घर निवडताना चोर अगदी बेसिक काळजी कुठली घेतात तर ते घर रिकामं आहे की नाही हे पाहणं. पण हे पुढचं प्रकरण बघा.

इंग्लंडमध्ये नाॅर्थहँपटन भागात चोरी करण्यासाठी डॅरन किंप्टन या चोराने एक घर हेरलं. आपलं चोरी करण्याचं सगळं कौशल्य पणाला लावत मागच्या दाराने या घरात आला आणि पुढच्या दारावर असणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडला.

या चोराचं नशीब एवढं खराब की या घरात नेमक्या त्याच रात्री हा चोर घुसण्याआधी दुसऱ्या एका चोराने आॅलरेडी चोरी केली होती. घरमालकाने पोलिसांना बोलावलं होतं आणि पोलिसांचं पथक या घरात तपास करत असताना हा भाऊ त्यांच्या ताब्यात सापडला.

ठीक आहे. या घरात आधीच चोरी झाल्याचं या चोराला माहीत नव्हतं. पण घराजवळची पोलिसांची वाहनं पाहून तरी थोडा विचार करायचा ना यार!

२. चोरीची रक्कम चेकने!

अमेरिकेतल्या बाल्टिमोर राज्यात १८ वर्षांचा चार्ल्स मेरीवेदर हा चोर एका घरात घुसला. त्या घरात राहणाऱ्या एका महिलेला बंदूक दाखवत तिच्याकडे त्याने पैसे मागितले. पण आपण घरात कॅश ठेवत नसल्याचं त्या महिलेने सांगितलं. “मग तू बिलं कशी भरतेस?” चार्ल्सने आश्चर्याने विचारलं. त्यावर आपण चेकने बिलं भरत असल्याचं ती म्हणाली.
“मग मला चेकने पैसे दे” चार्ल्सने तिला फर्मावलं

त्या बाईने शांतपणे चेकबुक उघडलं

“कितीचा चेक लिंहू?”

“तीस डाॅलर्सचा. नको पन्नास डाॅलर्सचा” 18 वर्षांचा चार्ल्स जमेल तेवढ्या कठोरतेने म्हणाला.

“बरं. चेक कोणाच्या नावाने?” त्या बाईने विचारलं

“चार्ल्स मेरीवेदर” त्याने बिनदिक्कतपणे सांगितलं

पन्नास डाॅलर्सचा चेक घेऊन हा महान चोर एकदम एेटीत त्या घराबाहेर पडला. पण त्याचं नाव त्या बाईने पोलिसांना सांगितल्याने काही तासातच त्याला अटक झाली.

३. “आहे त्यापेक्षा जास्त डोकं चालवू नकोस”

हा चोरसुध्दा १८ वर्षांचा आहे. २३ मार्च २०१०ला शिकागोमध्ये रूबेन नावाचा हा पोरगा एका मफलरच्या दुकानात चोरी करण्यासाठी शिरला. त्याने दुकानात शिरून कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली. पण हा प्लॅन काही चालला नाही. कारण त्या दुकानाचं इलेक्ट्राॅनिक कॅश रजिस्टर उघडायचा पासवर्ड फक्त मॅनेजरकडे होता आणि मॅनेजर बाहेर गेला होता.

“ठीक आहे. मॅनेजर आला की मला या नंबरवर फोन करून सांगा” असं सांगत त्याने चक्क त्याचा मोबाईल नंबर त्या कर्मचाऱ्यांकडे दिला आणि तो निघून गेला. अर्थातच काही वेळातच पोलिसांनी त्याला पकडलं.

४. पुन्हा पहिला मुद्दा… टार्गेट निवडण्यातच घोळ

अमेरिकेत पेन्सिल्व्हेनिया राज्यामध्ये एका हाॅलमध्ये एक छान सोहळा चालला असल्याचं दिसल्यावर जाॅन काँपॅरिटो या १९ वर्षाच्या चोराने तिथेच दरोडा टाकायचं ठरवलं. लग्नसोहळ्यामधल्या या सगळ्यांकडून जाम मोठं घबाड मिळेल असा अंदाज लावत जाॅन दबा धरून बसला.
काही वेळाने एक वयस्कर गृहस्थ टाॅयलेटमध्ये गेले. जाॅनने चपळाई करत टाॅयलेटमध्ये त्यांच्यावर बंदूक ऱोखत त्यांच्याकडे पैसे मागितले. एक तरणाबांड चोर आणि त्याच्यासमोर साठीचा म्हातारा ! प्रसंग खूप बाका होता. पण पुढच्या पाच मिनिटात जाॅनच्या हातात बेड्या होत्या!
याचं कारण म्हणजे ते वयस्कर गृहस्थ पेनसिल्व्हेनिया राज्याचे पोलीसप्रमुख होते आणि हा ‘लग्नसोहळा’ म्हणजे त्यांच्या रिटायरमेंटनिमित्त पोलीस दलाने दिलेली एक पार्टी होती! आणि या सोहळ्यातले पाहुणे म्हणून आलेले एकूणएक स्त्री-पुरूष त्या राज्यातले पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी होते!

वरची सगळी उदाहरणं एवढी हास्यास्पद आहेत की ती काल्पनिक वाटू शकतात. पण या १००% खऱ्या घटना आहेत. यासारख्या अनेक घटनांचं वर्णन नेटवर वाचायला मिळतं. या सगळ्या घटनांमध्ये या चोरांनी सुरूवात तर मोठ्या जोशात केली पण हे येड्यासारखे पोलिसांच्या ताब्यात सापडले.

शेवटी या सगळ्या चोरांचं नशीबच भोंदू होतं.

भा.पो.

 

.