मोबाईल त्यातही स्मार्टफोन हा सध्या अनेकांचा वीक पॉईंट झालेला दिसतो. जरा मोकळा वेळ मिळाला की अनेकजण मोबाईलवर असतात. यात लहान मुलेही मागे नाहीत. संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले असून १४ वर्षांपर्यंतची सर्वाधिक मुले दररोज २ तासांहून अधिक वेळ मोबाईलवर असतात. सध्या मोबाईल सहज उपलब्ध असल्याने लहान मुलांच्या हातातही हे उपकरण दिसल्यास त्यात कोणालाच वावगे वाटत नाही. कधी ती काळाची गरज म्हणून तर कधी त्यांना समजवण्यासाठी पालकही याचा वापर करताना दिसतात.

या संशोधनातून आणखीही काही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार १४ वर्षांपर्यंत मुलांनी मोबाईलचा वापर करुन ३५ हजार टेक्स्ट मेसेज केलेले असतात. तर ३० हजार व्हॉटसअॅप मेसेज केलेले असतात. तर या वयापर्यंत मुलांनी एकूण ३ आठवड्यांइतके व्हिडिओ चॅटींग केलेले असते. त्यामुळे लहान मुलांमध्येही आता तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आपल्याला म्हणता येईल. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, १४ वर्षांपर्यंतची मुले आपल्या आयुष्यातील जवळपास ६ महिने मोबाईलवर असतात.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वेक्षणामध्ये एकूण हजार मुलांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून अनेक निरीक्षणे समोर आली. ती म्हणजे, ८ ते १४ वर्षे वयातील ही मुले २ तासातील एक तासाहून अधिक वेळ फेसबुक, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. १० पैकी ६ मुले सकाळी झोपेतून उठल्यावर आपला मोबाईल पाहतात तसेच रात्रीही काही वेळ ते मोबाईलवर असतात. याशिवाय एक दिवसही स्मार्टफोनशिवाय राहणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड आहे. यातील केवळ ७ टक्के मुले मोबाईलविना राहू शकत असल्याचे समोर आले आहे.