मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने अपघातात जखमी झालेल्या मजूर महिलेला पाठीवर उचलून रुग्णालयात पोहोचवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसाच्या या कामगिरीचं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला असून संबंधित पोलिसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जबलपूरपासून ३५ किमी अंतरावर घुघरी गावाजवळ एक ट्रक दरीत कोसळला, यामध्ये ३६ मजूर प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २७ लोक गंभीररित्या जखमी झाले. जखमींमध्ये १२ वर्षापासून ६० वर्षांपर्यंतच्या लोकांचा समावेश होता. या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचवायचे होते. मात्र, यासाठी स्ट्रेचरही उपलब्ध नव्हते. यावेळी चरगवा पोलीस ठाण्याचे एएसआय संतोष सेन यांनी हिम्मत दाखवत जखमींना खांद्यावर उचलून घेत रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. यावेळी त्यांच्या सहकारी पोलिसांनीही त्यांना साथ दिली आणि इतर जखमींना उचलून घेत रुग्णालयात पोहोचवले.

आश्चर्याची बाब म्हणजे, या पोलीस कर्मचाऱ्याचे वय ५७ वर्षे आहे. २००६ मध्ये एका मोठ्या अपघातात जखमी झाल्यानंतरही ते पूर्णपणे फीट दिसून आले. १४ वर्षांपूर्वी नरसिंहपूरमध्ये पवन यादव नामक एका गुंडानं त्यांच्या उजव्या खांद्यावर गोळी मारली होती. त्यामुळे त्यांचा उजवा हाथ व्यवस्थित काम करत नाही. मात्र, तरीही त्यांनी दाखवलेल्या या शौर्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने त्यांना सलाम केला आहे.

सेन यांच्या या शौर्याला सलाम करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचाही समावेश आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन चव्हाण यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं, “एएसआय संतोष सेन यांच्यावर संपूर्ण मध्य प्रदेशला गर्व आहे. संतोष सेन हे तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्यासारखे लोक समाजाला दिशा देण्याचं काम करतात. मी त्यांच्या शौर्याला प्रणाम करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन करतो.”

जबलपूर रेंजचे आयजी भगवतसिंह चौहान यांनी बुधवारी एएसआय संतोष सेन यांच्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशंसा पत्र देताना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या पुरस्काराने सन्मानित केले. यापूर्वी जबलपूरच्या एसपींनी देखील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित केले होते.