द्वितीय महायुद्धाच्या काळात ज्या टेलिफोनवरुन लाखो जणांना मारण्याचे आदेश अॅडॉल्फ हिटलरने दिले होते, तो टेलिफोन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. लाल रंगाच्या या फोनची बोली १,००,००० डॉलर (६७ लाख रु) पासून सुरू होणार आहे.  काळ्या बेकलाइट फोनला लाल रंग देण्यात आला होता आणि त्यावर नाझी पार्टीचे प्रतीक काढण्यात आले होते. अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्स या कंपनीने या फोनची किंमत २,००,००० ते ३,००,००० डॉलरपर्यंत जाईल असे सांगितले आहे.  ज्यावेळी हिटलरने आत्महत्या केली , त्यावेळी हा  फोन बंकरमध्ये होता. रशियन फौजांनी हा फोन आपल्याकडे घेतला आणि त्यांनी ब्रिटीश ब्रिगेडियर राल्फ रेनर यांच्याकडे सोपवला. या फोनची मालकी रेनर यांच्याकडे होती. रेनर यांच्या मुलाने हा फोन विकण्याचे ठरवले आहे. अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्स या कंपनीतर्फे या फोनचा लिलाव करण्यात येणार आहे.

[jwplayer d6kmB72w]

१ लाख डॉलरपासून हा लिलाव सुरू होणार आहे. अंदाजे ३ लाख डॉलरपर्यंत पैसे मिळू शकतील असा कंपनीला अंदाज आहे. लिलावाची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते असे कंपनीने म्हटले आहे. जी वस्तू जितकी निराळी तितकी त्या वस्तूला अधिक किंमत प्राप्त होते. हिटलरने हा फोन द्वितीय महायुद्धाच्या काळात वापरला होता. हिटलरजवळ हा फोन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ होता. ज्या फोनद्वारे लाखो लोकांना मारण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत तो विकत घेण्यासाठी किती जण येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असे कंपनीने म्हटले आहे. हा फोन म्हणजे विध्वंसाचे प्रतीक आहे असे त्यांनी म्हटले. हिटलरच्या नेतृत्वात नाझी फौजांना ज्यू नागरिकांवर अत्याचार केले होते. हिटलरने ५५ लाख ज्यूंचे शिरकाण केल्याचे म्हटले जाते. द्वितीय महायुद्धाच्या काळात २० लाख नागरिक आणि युद्धकैद्यांना मारण्याचे आदेश हिटलरने दिले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीला हार पत्करावी लागली होती. ज्या वेळी रशियांच्या फौजा आपल्या बंकरजवळ आल्या आहेत असे लक्षात येताच हिटलरने आत्महत्या केली होती.

[jwplayer FXuZnzpt]