16 January 2019

News Flash

मुंबई दंगलीत प्राण वाचवणाऱ्या मुस्लिम कुटुंबाशी २६ वर्षांनी झाली शेफ विकास खन्नाची भेट

उपकाराची परतफेड म्हणून शेफ विकास गेल्या कित्येक वर्षांपासून रमजानच्या महिन्यात एक दिवस उपवास ठेवतो

२६ वर्षांनी शेफला या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली आहे.

मुंबई दंगलीच्या त्या कटू आठवणी कोणताही मुंबईकर विसरणार नाही. या दंगलीनं कित्येकांचे नाहक बळी घेतले होते. गुण्या गोविंदानं राहणारे शेजारीच एकमेकांच्या जीवावर उठले होते. पण अशाही परिस्थितीत अनेकांनी जात, धर्म असा कोणताही विचार न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राण वाचवले होते. सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यानंही या काळात अनेक कटू अनुभव घेतले. आज आपण जिवंत आहोत ते केवळ एक मुस्लिम कुटुंबामुळे असं तो नेहमीच सांगतो. या कुटुंबाचे ऋण फेडण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून शेफ विकास रमजानच्या पवित्र महिन्यात एक दिवस उपवास करतो.

शेफ विकास खन्ना अमेरिकेत वास्तव्यास होता त्यामुळे त्याचा या कुटुंबाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. अखेर २६ वर्षांनी शेफला या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली आहे. या कुटुंबाशी भेट घेऊन विकासनं आपला उपवास सोडला. आयुष्यातील हे सर्वात खास पण तितकेच भावूक क्षण त्याने फेसबुकवर शेअर केले आहे. मुंबई दंगल ज्यावेळी झाली त्यावेळी एका हॉटेलमध्ये आपण प्रशिक्षण घेत होतो. दंगलीमुळे सगळीकडेच जाळपोळ सुरू झाली. आपण जिवंत राहू की नाही याचीदेखील शाश्वती नव्हती अशावेळी दोन मुस्लिम व्यक्तीनं आपले प्राण वाचवले असं विकासनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ज्या व्यक्तींनी प्राण वाचवले ते आज हयात नाही पण, त्यांच्या कुटुंबाशी मात्र विकासनं भेट घेतली. ‘या वर्षीची ईद खऱ्या अर्थानं माझ्यासाठी खूप खास ठरली आहे, ज्या व्यक्तींनी या कुटुंबाशी भेट घडवण्यासाठी मला मदत केली त्या सगळ्यांचे आभार’ असं लिहित विकासनं या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे.

First Published on June 13, 2018 4:10 pm

Web Title: after 26 year chef vikas khanna finds muslim family who save him from mumbai riots