चेन्नईतील सुप्रसिद्ध स्टॅच्यू मॅनवर करोना काळ आणि लॉकडाउन यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मागील ३५ वर्षांपासून स्टॅच्यू मॅन म्हणून काम करणारे अब्दुल अझीझ हे आता त्यांची स्टॅच्यू मॅनची नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. कारण त्यांना पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. आर्थिक चणचण भासत असल्याने ते ही नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. मागील ३५ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई या शहरात असलेल्या VGP थीम पार्कमध्ये स्टॅच्यू मॅन म्हणून काम करतात. या थीम पार्कला भेट देणाऱ्यांसाठीचं ते प्रमुख आकर्षण आहेत. मात्र करोनामुळे जो लॉकडाउन जाहीर झाला त्या काळात या थीम पार्कच्या नोकरीतून त्यांना पुरेसा पगार मिळेना. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण भासू लागली.

अब्दुल अझीझ यांनी १९८५ मध्ये चेन्नईतल्या VGP युनिव्हर्सल किंग्डम थीम पार्कमधून त्यांच्या नोकरीला सुरुवात केली होती. मात्र आता पगार कमी झाल्याने आणि तो पुरत नसल्याने अब्दुल अझीझ हे नोकरी सोडण्याचा विचार करत आहे.

“लॉकडाउन सुरु झाल्यापासून कंपनी बंद झाली. तरीही मी तिथे काम करतो आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून मला काम मिळत नाहीये. मी याबाबत मॅनेजमेंटकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले की पार्क १ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येईल. मात्र १ ऑक्टोबरला पार्क सुरु होईल की नाही हे अद्याप नक्की झालेलं नाही. मला शेवटचं वेतन एप्रिल महिन्यात मिळालं होतं. एप्रिलमध्ये मिळालेला पगारही अर्धा होता. मात्र मागील पाच महिन्यांपासून मला पगार मिळालेला नाही. मला काही वस्तू विकून उदरनिर्वाह करावा लागतो. कंपनीने जुन्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या काळात एक रुपयाही पगार दिलेला नाही. ” असंही अझीझ यांनी सांगितलं.

 

आणखी काय म्हणाले अब्दुल अझीझ?

“मी ३७ वर्षांपूर्वी VGP या कंपनीत नोकरी सुरु केली. त्यानंतर मी स्टॅच्यू मॅन म्हणून सिंगापूर, मलेशिया या देशांनाही भेटी दिल्या. मात्र सध्याच्या काळात ही नोकरी सोडण्याचा विचार मी करतो आहे. मी आता पूर्वीसारखा तरुण राहिलो नाही. मी ५६ वर्षांचा आहे. याआधी २००६ मध्येही मी कंपनीला सांगितलं होतं की ही नोकरी सोडण्याची माझी इच्छा आहे. मी त्यावेळी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कंपनीच्या मालकाने मला त्यावेळी २ हजार रुपये पगार वाढ दिली. त्यामुळे मी ही नोकरी सोडली नाही. मात्र आा मला कठोर निर्णय घ्यावा लागणार असं दिसतं आहे. मला तीन मुलं आहेत. त्यांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मात्र त्यांना नोकरी मिळालेली नाही. माझं घर पूर्णपणे माझ्या पगारावर अवलंबून आहे.”