स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही छत्तीसगडमधील एका गावात अद्याप वीज पोहचलीच नाही. १०० उंबऱ्याचं असलेल्या त्रिशुला या गावात अद्याप वीज पोहचलीच नाही. गेल्या वर्षी मोदी सरकारनं देशातल्या सर्व गावांत वीज पोहोचवल्याचा दावा केला होता. वीज तर नाहीच शिवाय या गावांमध्ये मुलभूत सोयी-सुविधाचांही तुटवडा आहे. प्रशासनाला अद्याप गावाच्या विकासासाठी जागच आली नसल्याचे चित्र आहे.

त्रिशुला गावातील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पत्रांमध्ये गावकऱ्यांनी वीज नसल्यामुळे होणारं हाल आणि मुलांच्या अभ्यासच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. सुर्यास्त झाल्यानंतर गावात अंधार असतो. त्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही. अनेकवेळा मुलं कंदील घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रत्येकाच्या मर्यादा असतात, असे पत्रात नमूद केले आहे.

वीज न पोहचलेल्या गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माजरा-टोला विद्युतीकरण योजनेंतर्गत त्रिशूली गावात वीज पोहोचवली जाईल. त्याचप्रमाणे इतर गावांतही वीज पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे.