मागील काही आठड्यांपासून सोशल मिडियावर गोविंदा अंकल किंवा डासिंग अंकल नावाने नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या काकांच्या डान्सची चांगलीच चर्चा रंगली. एका लग्नासमारंभात आपल्या पत्नीबरोबर नाचणाऱ्या प्राध्यापक संजीव श्रीवास्तव हे रातोरात हिरो झाले. अगदी दस का दम पासून ते अनेक टिव्ही चॅनेल्सवर ते झळकले. मात्र आता या काकांना टक्कर देण्यासाठी एक काकू आल्या आहेत आणि त्याही थेट यो यो हनी सिंगच्या गाण्यावर नाचणाऱ्या. सध्या या काकूंचा डान्स फेसबुकर व्हायरल झाला आहे.

फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गुलाबी साडी नेसलेल्या या काकू चक्क यो यो हनी सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ‘पार्टी ऑ नाईट’ या गाण्यावर काकूंनी अगदी मनमोकळेपणे डान्स केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. अगदी डोक्यावर पदर वगैरे सावरत या काकू अनेक उपस्थितांसमोर या पार्टी साँगमधील एकही बीट न चुकवता ठेका धरताना दिसत आहेत. फेसबुकवरील व्हायर गुजरात या पेजने शेअर केलेला हा व्हिडीओ २५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला २९ हजार जणांनी आपल्या वॉलवर शेअर केले आहे तर ४९ हजार जण या व्हिडीओवर रिअॅक्ट झाले आहेत.

अनेकांना या काकूंनी साडी नेसल्यानंतरही केलेल्या हनी सिंग स्टाइल मुव्हस भलत्याच आवडल्या आहेत. साडी नेसून डान्स केल्याबद्दल अनेकांनी कमेन्ट्समध्ये या काकूंचे कौतूक केले आहे. सध्या हा व्हिडीओ भरपूर शेअर होताना दिसत आहे. त्यामुळे रातोरात लोकप्रिय होणाऱ्यांच्या यादीमध्ये या काकूंचाही समावेश झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि भविष्यात या काकू एखाद्या शोमध्ये वगैरे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.