बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी गळफास घेऊन सुशांतने त्याच्या जीवनाचा अंत केला. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेनंतर सोशल मीडियावर नेपोटिझ्म म्हणजे घराणेशाहीविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केल्यानंतर १५ जूनपासून घराणेशाही हा शब्द सर्च करण्यामध्ये जवळपास २ हजार टक्क्यांनी वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.

‘SEMrush’ (एसइएमरश) यांच्या सर्वेक्षणातून, मे २०१९ ते जून २०२० या कालावधीत नेपोटिझ्म म्हणजेच घराणेशाही हा शब्द सोशल मीडियावर सर्वाधिक वेळा सर्च केली माहिती समोर आली आहे. या काळात जवळपास ६२ हजार ४५८ वेळा हा शब्द सर्च झाला. विशेष म्हणजे सुशांतच्या आत्महत्येनंतर या शब्दाच्या सर्चमध्ये झपाट्याने वाढ झाली, असं ‘नॅशनल हेरॉल्ड’ यांच्या वृत्तात म्हटलं आहे.

तसंच सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर कसे बदल झाले हे पाहण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळांवरुन ट्विटवरील डेटादेखील ट्रॅक करण्यात आला. यात #NepotismBollywood,  #BollywoodBlockedSushant, #JusticeForSushantRajput आणि #KaranJoharssBULLY  हे हॅशटॅग अनेक वेळा वापरण्यात आले आहेत, तसंच सर्चही झाले आहेत. तसंच १७ जूनपर्यंत #NepotismBollywood,  #BollywoodBlockedSushant, #JusticeForSushantSinghRajput, आणि  KaranJoatIsBULLY हे हॅशटॅग अनुक्रमे ३ हजार ९६१, १० हजार ५२०,३६ हजार २९२ आणि १० हजार २३० वेळा वापरले गेले आहेत.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये एकच खळबळ उडाली. काहींच्या मते, सुशांतने नैराश्यात येऊन आत्महत्या केली, तर काहींच्या मते, कलाविश्वातील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वीच त्याचा शवविच्छेदनाचा अहवाला आला. यात गळफास घेतल्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे सुशांतचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, याप्रकरणी सुशांतच्या चाहत्यांनी आणि काही कलाकारांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.