काही महिन्यांपूर्वी बांगलादेशातून उत्तम कुमार घोष आणि त्यांची आई किडनीच्या प्रत्यारोपणासाठी कोलकात्यात आले होते. परंतु किडनी प्रत्यारोपण करणं डॉक्टरांसाठीही आव्हानात्मक ठरलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते दोघेही करोना विषाणूच्या विळख्यातून बाहेर आले होते. परंतु डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत उत्तम कुमार घोष यांना नवीन जीवन दिलं आहे.

घोष हे याच वर्षी जानेवारी महिन्यात शत्रक्रियेसाठी आपली आई आणि कुटुंबातील दोन सदस्यांसोबत भारतात आले होते. आरएन टागोर इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कार्डिअॅक सायंसेसमध्ये डॉक्टरांनी त्यांच्यावरील शस्त्रक्रियेची तारीख निश्चित केली. परंतु अचानक लॉकडाउन लागू झाल्यानं त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. परंतु लॉकडाउनच्या कालावधीतही अशा शस्त्रक्रियेला सरकारनं परवानगी दिल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

परंतु शस्त्रक्रियेपूर्वी घोष यांच्या आईला त्यांना स्वत:ला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आरटीआयसीसीएसच्या किडनीच्या आजारांच्या विभागाचे प्रमुख डी. एस. रे यांनी सांगितलं की, “दोघांनाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना एमआर बांगूर या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.” करोनातून ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना १२ जून रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर आम्ही साडेतीन आठवडे वाट पाहिली आणि त्यांना घरात अलगीकरणात राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. तसंच त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

“सध्या त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोघांनाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे आणि ते लवकरच बरे होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. योग्य त्या चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात येण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसंच त्यांना काही महिने या ठिकाणी राहण्यासही सांगितलं आहे,” असं डॉ. रे म्हणाले.