निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी अनेक आश्वासने देतात. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अनेक पोकळ आश्वासने दिसून येतात. एकदा का निवडणुका संपल्या की, राजकीय लोक जनतेपासून चार हात लांबच असतात असे दिसून येते. अशा लोकप्रतिनिधींविरोधात जनतेचा रोष तुम्ही कधी पाहिला आहे का? खूप कमी वेळा असं झालं असेल की लोकप्रतिनिधींना जनतेने कामाचा जाब विचारला असेल. तसंच दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून लोकप्रतिनिधीनं स्वत:ला शिक्षा दिल्याचं प्रमाण कमीच आहे. पण मेक्सिकोचे महापौर चक्क स्कर्ट घालून शहरभर फिरले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दक्ष‍िण मेक्‍स‍िकोमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे महापौर घागरा आणि चोळी घालून शहरभर फिरत आहेत. स्थानिक वृत्तपत्रानुसार, अन्य दोन अधिकारीही महिलांचे कपडे घालून रस्त्यावर फिरले.

शहरभर फिरताना मेहर जेवियर जिमेनेज यांच्या पाठीमागे काही लोक पोस्टर घेऊन होते. “दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे शिक्षा”, असे त्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

जेवियर जिमेनेज यांनी शहरात पाण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन निवडणुकीत दिलं होते. त्यांनी आश्वासन पूर्ण न करता एक कोटी आठ लाखांची खिरापत त्यांच्या पाठिराख्यांमध्ये वाटल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.