ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने झारखंड आणि ओडिशानंतर आता पश्चिम बंगालमध्येही घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि सिलीगुडीमध्ये ही सेवा सुरू होत असून लवकरच राज्यातील अन्य शहरांमध्येही  घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

करोना व्हायरसच्या संकटामुळे दुकानांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केली असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. “झारखंड आणि ओडिशामध्ये यशस्वीपणे घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केल्यानंतर आता आम्ही पश्चिम बंगालमध्येही ही सेवा सुरू करत आहोत. पहिल्यांदा कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य २४ शहरांमध्येही सेवा सुरू करु”, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परवाना आणि अन्य कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या सेवेसाठी राज्यातील काही रिटेल विक्रेत्यांसोबत भागीदारी केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या सेवेसाठी ग्राहकाला वय, वैध सरकारी ओळखपत्राची प्रत आणि स्वतःचा एक फोटो अपलोड करावा लागेल. तसेच ग्राहकाला एका ठरावीक मर्यादेपर्यंतच मद्याची ऑर्डर करता येईल. ‘स्विगी’ने आपल्या अ‍ॅपमध्ये वाईन शॉप्स ही कॅटेगरी सुरू केली असून त्याद्वारे ऑर्डर करणाऱ्यांना घरपोच मद्य पोहोचवलं जाणार आहे.