विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम खूपच हताश असल्याचं दिसतंय. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात अधिक चौकार मारल्याच्या निकषावरुन इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आलं. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडसाठी जिमी नीशम फलंदाजीसाठी आला होता, त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार देखील खेचला. मात्र संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

पराभवानंतर जिमी नीशमने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्या ट्विटमध्ये त्याने लहान मुलांना भविष्यात क्रीडा क्षेत्रात न येण्याचा  सल्लाही दिला आहे. सामना संपल्यानतर नीषमने एकूण तीन ट्विट केलेत. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्वप्रथम त्याने, ‘हे दुःखद आहे… अशी अपेक्षा ठेवतो की पुढील दशकभरात किमान एक-दोन दिवस तरी असे येतील की  या सामन्याच्या अखेरच्या अर्ध्या तासाबाबत मनात विचार येणार नाही. इंग्लंडला शुभेच्छा ते विजयाचे दावेदार होते’ हे ट्विट केलं.

त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये नीशमने ‘आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व समर्थकांचे आभार. दिवसभर तुमचा आवाज आम्ही ऐकला पण तुम्हाला अपेक्षित निकाल आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व’ असं म्हटलं. त्यानंतर अखेरच्या ट्विटमध्ये नीषमने ‘मुलांनो क्रीडापटू होऊ नका, त्यापेक्षा आचारी (हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करा ) किंवा इतर काहीतरी व्हा…आणि जाडजुड व आनंदी असताना वयाच्या 60 व्या वर्षी मृत्यू पत्करा’ असं हताश ट्विट केलंय.