भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर हैदराबादच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरेंद्र सेहवागने सलाम केला आहे. गेल्या सात वर्षांपासून गंगाधर टिळक कथनाम हे हैदराबाद शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करत असून सेहवागने ट्विटरवर त्यांचा फोटोदेखील शेअर केला आहे.
हैदराबादच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गंगाधर कथनाम त्रस्त झाले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी खड्डे बुजवण्याची मोहीमच हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपये खर्च करुन एक खड्डा बुजवला होता. पण ते यावरच थांबले नाहीत.

त्यांनी ख़ड्डे बुजवण्याचा ध्यासच घेतला. रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गंगाधर कथनाम यांनी पेन्शनमधून रस्ते दुरुस्तीचे काम करतात. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे बाराशे खड्डे बुजवले आहेत. गंगाधर कथनाम यांच्या कामाने सेहवाग प्रभावित झाला असून त्याने ट्विटरवर गंगाधर कथनाम यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गंगाधर कथनाम खड्डे बुजवण्याचे काम करताना दिसत आहेत. सेहवागने ट्विट केल्यानंतर अनेकांनी गंगाधर कथनाम यांच्या मोहीमेचे कौतुक केले आहे.