नागपूरमधील दक्षिणामूर्ति स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये गडकरींनी राजकारणाबरोबरच अनेक मजेदार किस्से सांगितले. स्वत: उत्तम खवय्ये असणारे गडकरी नागपूरमध्ये लहानपणी मिळणाऱ्या चार आण्याच्या समोसा ते अगदी दिल्लीमध्ये सुरु झालेले मराठमोळे पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंटबद्दल अनेक गोष्टींबद्दल भरभरुन बोलले. नागपुरच्या चिटणीस पार्कवर पार पडलेल्या या कार्यक्रमात मोदींनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या मिसळ खाण्याचा किस्सा ही उपस्थितांबरोबर शेअर केला.

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण असून अनेक क्षेत्रातील बड्या व्यक्तींना महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आवडतात असं गडकरींनी यावेळी बोलताना सांगितले. या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये गेट्स दांपत्य आलेले त्यावेळेचा एक किस्सा सांगितला. ‘दिल्लीला एका माझ्याकडे बील गेट्स आणि त्यांची पत्नी पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळेस माजी पत्नी कांचनही दिल्लीतच होती. गेट्स दांपत्य येणार म्हणून काय खायला करु, त्यांना काय आवडेल असे प्रश्न त्यावेळी पत्नीने मला विचारल्याची आठवण गडकरींनी सांगितली. ‘मी तिला मिसळ करायला सांगितली. त्याप्रमाणे तीने मस्त मिसळ केली. आलू-पोहा, चण्याचा रस्सा आणि त्यावर गाठीशेव आणि कांदा वगैरे टाकून मी स्वत: त्यांना गेट्स दांपत्याला मिसळ बनून दिली. त्यांच्या पत्नीला ती मिसळ इतकी आवडली की तिने इंग्रजीमध्ये पती बील यांना दमच भरला. ‘का तुम्ही मला नेहमी तो अमेरिकन नाश्ता करायला आग्रह करता. हे किती छान आहे,’ असं म्हटल्याची आठवण गडकरींनी हसत हसत सांगितली. तसेच सामान्यपणे अमेरिकन लोक तिखट पदार्थ खात नाहीत. पण मिसळ मेलिंडा गेट्स यांनी इतकी आवडली की त्या थेट रस्सा पिऊ लागल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ‘या अनुभवावरुन मी इतकं ठामपणे सांगू शकतो की आपले सगळेच पदार्थ चांगले असतात,’ असं मत गडकरी यांनी व्यक्त केले.

‘दिल्लीतही मराठमोळ्या पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळावेत मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये पार्लमेंटसमोर सात मजली पार्किंगची सोय केली आहे. या इमारतीच्या आठव्या मजल्यावर मराठी रेस्टॉरंट सुरु केलं आहे. तिथे वडापाव, पावभाजी, थालीपीठ असे सगळे महाराष्ट्रीय पदार्थ आणि मसाला डोसा, पुलाव यासारखे पदार्थही तिथे मिळतात. आता तिथे खूप लोक यायला लागलेत. तिथे सर्वांना महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. दिल्लीत हे रेस्टॉरंट लोकप्रिय झाले आहे. त्याचे आचारी मुळचे मुंबईचे आहेत,’ अशी माहितीही गडकरी यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहे.