फक्त १ रुपयांत प्रवास करण्याची संधी ‘एअर डेक्कन’ विमानसेवा ग्राहकांना देत आहे. सर्वात कमी भाडे आकारणारी ही विमानसेवा काही सुदैवी प्रवाशांना १ रुपयांत प्रवास करण्याची संधी देणार आहे. एअर डेक्कनचं पहिलं विमान २२ डिसेंबरला उड्डाण करणार असून, मुंबई ते नाशिक दरम्यान ही विमानसेवा असणार आहे.

एअर डेक्कन ही विमानसेवा २००३ मध्ये जी आर गोपीनाथ यांनी सुरू केली होती. २००८ मध्ये या विमानसेवेचं किंगफिशर विमानसेवेत विलिनीकरण करण्यात आलं. पण, २०१२ मध्ये आर्थिक अडचणींमुळे एअर डेक्कनची विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. पण, आता एअर डेक्कननं पुन्हा भरारी घेण्याचं नक्की केलं आहे. कमी प्रवासी भाडं असल्यानं देशातील सामान्य माणसांचा या विमानसेवेला जास्त प्रतिसाद लाभेल अशी आशा गोपीनाथ यांनी व्यक्त केली आहे.

एअर डेक्कनच्या नाशिक मुंबई प्रवासासाठी किमान भाडं हे १४०० रुपये असणार आहे. तर काही निवडक सुदैवी प्रवाश्यांना मात्र १ रुपयात प्रवास करता येणार आहे. फक्त ४० मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. लवकरच पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर यांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा एअर डेक्कनचा मानस आहे. तर पुणे, मुंबई, जळगावसाठी ही सेवा नियमित सुरू करण्याचा विचार ही विमानसेवा करत आहे. जानेवारी २०१८ मध्ये विमानसेवेचा विस्तार हा आग्रा, शिमला, लुधीयाना, डेहरादून, कुलूपर्यंत होणार आहे. दिल्ली विमानतळावरून या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे.