बॉल टँपरिंग प्रकरण ऑस्ट्रेलिया संघाला चांगलंच भोवलं. बॉल टँपरिंगची कबुली दिल्यानंतर संपूर्ण जगभरात ऑस्ट्रेलियन संघावर जोरदार टीका होत आहे. ऑस्ट्रेलियन संघाची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यातून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कप्तान स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरॉन बँकरॉफ्ट या तिघांना दक्षिण अफ्रिकेतून माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात मायदेशी परतल्यावर स्टिव्हला सर्वांच्या रोषाला जावं लागणार हे नक्की. संपूर्ण देशभरातून स्टिव्हवर टीका होत असताना एअर न्यूझीलंड ही विमानसेवादेखील  शाब्दिक फटकेबाजीच्या युद्धात उतरली आहे.

VIDEO : हो आम्ही रडीचा डाव खेळतो, ऑस्ट्रेलियाची कबुली

एअर न्यूजीलंडनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात स्टिव्हचा खरपूस समचार घेतला आहे. स्टिव्हविरुद्ध सध्या ऑस्ट्रेलियात वातावरण तापलं आहे. तिथे गेल्यानंतर अर्थात स्टिव्हला क्रिकेटप्रेमींच्या जबर रोषाला सामोरं जावं लागणार आहे, तेव्हा स्टिव्हनं तिथे न जाता न्यूझीलंडमध्ये यावं कारण इथलं वातावरण खूपच थंड आहे. त्यामुळे स्टिव्हला इथे थोडा आराम करता येईल शिवाय बॉल स्विंग होण्यासाठी जो आटापीटा ऑस्ट्रेलियन टीमनं केला, तो कसा रडीचा डाव न खेळता स्विंग होऊ शकतो याचं नियमानुसार शिक्षणही घेता येईल अशी तुफान टोलेबाजी एअर न्यूजीलंडनं आपल्या व्हिडिओतून केली आहे.

फटकेबाजी करण्यासाठी एअर न्यूजीलंडनं लावलेली फटकेबाजी ऑस्ट्रेलियन चाहत्यांना रुचेल की नाही हे माहिती नाही पण भारतीय क्रिकेटप्रेमींना मात्र ही फटकेबाजी तुफान आवडली आहे. दरम्यान बॉल टँपरिंग प्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची तर चेंडू कुरतडणारा बँक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.