16 December 2017

News Flash

होऊ दे चर्चा, ‘मोदी’ लढवताहेत सरपंचपदाची निवडणूक!

अजितभाई दस्तगिर मोदी असे या उमेदवाराचे नाव आहे

कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड | Updated: October 13, 2017 9:32 AM

अजितभाई मोदी आणि त्यांचे समर्थक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. त्यांच्यासारखेच नाव असलेले एक उमेदवार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उतरले आहेत. नामसाधर्म्यामुळे हे मोदी पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत आहेत. अजितभाई दस्तगिर मोदी असे या उमेदवाराचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील वावरहिरे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उभे आहेत.

अजितभाईंचे आडनाव मोदी असल्यामुळे ते गावाबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ मोदीजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी सध्या वावरहिरे गाव दणाणून सोडले आहे. यामुळे प्रत्येकाला परत लोकसभेची निवडणूक लागली आहे का, असाच भास होतो आहे. कारण या ठिकाणी ‘मोदी’ हे सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी चहा विकण्याचे काम केले होते. परंतु, वावरहिरे गावातील मोदी हे व्यवसायाने शेतकरी आहेत. हातात कुठलेही पद नसताना गावच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवले. यासाठी त्यांनी नागरिकांना एकजुटीचा मंत्र दिला, असे काही नागरिक सांगतात.

अजितभाई मोदी हे अपक्ष लढणार असून, काँग्रेसचे चंद्रकांत वाघ आणि राष्ट्रवादीचे कडवं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. या गावात तसा भाजप आणि शिवसेनेचा दूरपर्यंत संबंध नाही. गावात प्रचाराला जोर आला असून, मोदींच्या नावाचा गजर या प्रचारात पाहिला मिळत आहे.

First Published on October 13, 2017 9:28 am

Web Title: ajitbhai modi contesting sarpanch election in satara district now in trending