आपल्यापैकी अनेकांना प्रँक व्हिडिओ आता परिचयाचे झाले असतील. अगदी रात्री पांढऱ्या रंगाचे कपडे घालून पदचाऱ्यांना घाबरवणं असो किंवा लहान मुलांच्या मदतीने केलेला एखादा प्रँक असो सर्व प्रकारचे प्रँक पाहून अनेकजण खदखदून हसतात. मात्र कधीतरी विनोदाची मर्यादा ओलांडली जाते आणि प्रँक करणारे अडचणीत सापडतात. असच काहीसं झालं अमेरिकेमधील कॅलिफॉर्नियामध्ये. प्रँकच्या नावाखाली दोन भावांनी असं काही कृत्य केलं की त्यांना आता चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. एबीसी सेव्हन या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

झालं असं की अ‍ॅलन स्ट्रोक्स आणि अ‍ॅलेक्स स्ट्रोक्स या दोन जुळ्या भावांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलसाठी बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रँक केला. या दोघांच्या युट्यूब चॅनेलला ४८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या दोघांनी आपल्या युट्यूब चॅनेलसाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये बँकेवर खोटाखोटा दरोडा टाकण्याचा फ्रँक केला. या दोघांना उबर चालक आणि बँकेबाहेर असणाऱ्या काही लोकांना या प्रँकमध्ये गंडवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनाही काळे मास्क, हातमोजे घालून चोरांसारखी वेशभूषा करुन हातामध्ये रोख रक्कम असलेल्या मोठ्या बँगा घेऊन बँक लूटून आपण पळून जात असल्याचे नाटक केलं. बँकेतून आम्ही पळून आले असून आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी मदत करा असं हे येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते. मात्र त्यांचा हा प्रँक सुरु असतानाच स्थानिक पोलीस खात्याच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी उबरच्या चालकाला ताब्यात घेतले. मात्र त्याचा याच्याशी काही संबंध नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं.

पोलिसांनी जेव्हा गन पॉइण्टवर स्टोर्क्स बंधूंना शरण येण्यास सांगितले तेव्हा त्यांनी हा एक प्रँक असल्याचा खुलासा केला. मात्र यामुळे पोलिसांना फारसा फरक पडला नाही. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची सविस्तर चौकशी केली आणि त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं. मात्र एवढं घडल्यानंतरही या दोघांनी विद्यापिठाच्या परिसरामध्ये असाच प्रँक केला. या विद्यापिठामधील विद्यार्थ्यांनी ९११ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन बँकेमध्ये दरोडा पडल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणामध्ये स्टोर्क्स बंधूंविरोधात हिंसाचार, गोंधळ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेचाही गोंधळ उडाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. नुकतीच या प्रकरणाची घटना घडल्यानंतर ९ महिन्यानंतर सुनावणी झाली.

“हा प्रँक नसून गुन्हा आहे. यामध्ये एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाली असती किंवा तिचा जीवही जाऊ शकला असता. लोकांच्या जीवाचे आणि संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. जेव्हा आपत्कालीन क्रमांकावर फोन येतो तेव्हा पोलीस त्यांच्या कर्तव्यानुसार त्याची दखल घेऊन कारवाई करतात. मात्र पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सवंग लोकप्रियतेसाठी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. या कृत्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांचाही जीव या दोघांनी धोक्यात टाकला,” असं मत आर्यव्हीन ऑरेंज कंट्रीचे जिल्हा न्यायाधीश टोड स्पीटझर यांनी व्यक्त केलं आहे.

हा व्हिडिओ युट्यूबवरुन डिलीट करण्यात आला आहे. असं असलं तरी या दोघांनाही सुनावणीदरम्यान सर्वाधिक शिक्षा झाल्यास चार वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.